Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखकोरोनाची दहशत

कोरोनाची दहशत

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूची जागतिक विश्वव्यापी साथ जाहीर केली आहे. एखादा रोग जगाच्या अनेक भागांत पसरू लागतो व त्याचा फैलाव धोकादायक वाढू लागतो तेव्हाच त्याला ‘जागतिक साथ’ म्हटले जाते. चीनमधून सुरू झालेला कोरोनाचा विषाणू आता जगातील 110 देशांपर्यंत पोहोचला आहे. भारतात कोरोनाने शिरकाव केला असून तो हळूहळू पसरू लागला आहे.

राजस्थानमधून त्याची सुरुवात झाली. आता महाराष्ट्रासह 13 राज्यांत पोहोचला आहे. गुरुवारी कर्नाटकात कोरोनाचा पहिला बळी गेला. देशात कोरोनाचे 78 रुग्ण झाले आहेत. नंदुरबारपर्यंत हा विषाणू पोहोचला की काय? अशी भीती परवा निर्माण झाली होती. परंतु, तो अहवाल निगेटिव्ह आला. एकंदरीत कोरोनाचा धसका आपल्या घरापर्यंत आला आहे. चार राज्यांनी कोरोनाची साथ जाहीर केली असून पाच राज्यांत शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

‘आयपीएल’ सारखी स्पर्धाही 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 2008 नंतरची मंदी कोरोनामुळे जागतिक पातळीवर आली आहे. त्याचा फटका पर्यटन उद्योगास सर्वाधिक बसला असला तरी सवर्र्च क्षेत्रांना त्याची बाधा झाली आहे. 19 फेब्रुवारीला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 40 हजारांपेक्षा जास्त होता, आता तो 33 हजारांच्या खाली आला आहे. 12 वर्षांनंतर शेअर बाजारात ‘लोअर सर्किट’ लावण्याचा प्रसंग शुक्रवारी आला. 45 मिनिटे व्यवहार थांबवावे लागले.

कोरोनाची ही दहशत आता आपल्याही उंबरठ्यावर आली आहे. यामुळे कोरोनाची साथ गंभीरपणे घेण्याची गरज आहे. जागतिक पातळीवर त्यावरील लस शोधणे व संशोधनासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. परंतु, अजूनही त्याला यश आले नाही. जगभर दहशत माजवणारा हा म्हणजे कोविड-19 विषाणू आहे. गेल्या तीन दशकांत तीन नवे व्हायरस आढळले. सार्स, मार्स आणि आताचा कोविड-19 म्हणजेच कोरोना या तिन्हींचे एकच जैविक कुटुंब आहे.

कोरोना व्हायरसची निर्मिती मानवाने केली नाही. हा व्हायरस कुठून जन्माला आला, हे सध्या वैज्ञानिक शोधत आहेत. परंतु, सोशल मीडियात आपणच डॉक्टर आहोत, अशा थाटात सल्ले देणार्‍यांची व वाटेल तशी निराधार आकडेवारी सांगून समाजात भीती पसरवणार्‍या महाभागांची संख्या रोज वाढत आहे. भीतिग्रस्त लोकांचे समुपदेशन करण्याची वेळ मानसोपचार तज्ज्ञांवर आली आहे. सरकारकडून प्रयत्न होत आहेत. पण आपली जबाबदारी वाढली आहे.

समाजात अफवा पसरणार नाही, यासाठी सोशल मीडियाचा वापर आपण सांभाळून करायला हवा. ‘घाबरू नका, पण काळजी घ्या’ असे संयमी आवाहन जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनीही केले. त्या पद्धतीने आपण खबरदारी घेतली तर कोरोनाचा हा धोका निश्चितच परतवून लावू.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या