येवला । प्रतिनिधी
तालुक्यातील अंकाई किल्ला परिसरातील माकडांची पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे भटकंती होत असल्याचे वृत्त देशदूत ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत वन विभागाने माकडांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
रविवारी, (दि. २) देशदूतने “अन्न पाण्याच्या शोधत माकडे गावाकडे” या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यात, सर्वत्र उष्णता वाढत असून, वनातील पाणवठे सुकायला लागले आहेत. या स्थितीत शुद्ध आणि थंडगार पाणी पिण्याची सवय असलेल्या वन्यजीवांचा जीव कासावीस होत आहे.
येवला तालुक्यातील अंकाई किल्ला व परिसरातील जंगलात माकडांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्याच्या तडाख्याने या माकडांना परिसरातील अन्न आणि पाणी मिळणे दुरापास्त झाले असल्याने त्यांचे कळप सैरभैर होऊ लागल्याने त्यांनी आपला मोर्चा गावांकडे वळविला असल्याचे म्हटले होते. अंकाई किल्ला व परिसरातील माकडांसाठीही वनविभागाने पाण्याची सोय करावी अशी मागणी नागरिकांमधून होत असल्याचे स्पष्ट करून, माकडांची पाण्याची सोय जर त्यांच्या सानिध्यात केली तर माकडांचा त्रास कमी होईल अशी भावना गावातील नागरिकांनी व्यक्त केल्याचे सदर वृत्तात म्हटले होते.
वन विभागाच्या वतीने, अंकाई किल्ला येथे माकडांसाठी जैन लेणी येथे पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. येवला वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी, तात्काळ तिथे पाण्याच्या टाकीच्या व्यवस्था करण्याचे आदेश दिले. वनरक्षक वंदना खरात, वन सेवक बाळकृष्ण सोनवणे, सचिन साळे यांनी पाण्याच्या टाक्यांच्या माध्यमातून माकडांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. तर वन हद्दीतील कृत्रिम पणवठयांमध्ये देखील टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे.