जुने नाशिक । प्रतिनिधी Nashik
शहरात मागील चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे गटारींचे ढापेदेखील खचल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. जुने नाशिकच्या भद्रकाली मुख्य बाजारात असाच एक ढापा धोकादायक बनला होता. स्थानिकांनी त्याला फडके बांधून ठेवले होते. याबाबत ‘देशदूत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर मनपाने त्वरित त्याची दखल घेऊन तो ढापा दुरूस्त केल्याने नागरिकांनी आभार
मानले आहेत.
याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संदेश फुले यांनीदेखील ‘देशदूत’ व मनपाचे आभार मानले. त्याचप्रमाणे शहरातील इतर भागातदेखील खड्डे व धोकादायक ढापे असून मनपाने त्याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. भद्रकाली परिसरातील किराणा मार्केट येथील सरस्वती नाल्यावर तो ढापा धोकादायक परिस्थितीत आला होता. त्याची महापालिकेला ऑनलाईन तक्रार देऊनही कार्यवाही झाली नव्हती. मात्र वृत्त प्रसिद्ध झाल्यावर त्वरित सकाळी मनपाचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले व नवीन ढापा बसवला. त्यामुळे नागरिकांसह व्यापार्यांनी समाधान व्यक्त केले.