Sunday, September 22, 2024
Homeमुख्य बातम्याDeshdoot News Impact : मनपा आयुक्तांकडून स्मशानभूमींची पाहणी

Deshdoot News Impact : मनपा आयुक्तांकडून स्मशानभूमींची पाहणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील चारही विभागातील स्मशानभूमींची पाहणी करुन दुरुस्तीची कामे 31 मार्चअखेर पूर्ण करण्याचा आदेश दिले. याबाबत दै. देशदूतने ‘फोकस’ ( Deshdoot- ‘Focus’)या मालिकेतून शहरातील अमरधामची दुरवस्था मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी केलेल्या पाहणीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच अमरधाममध्ये सुशोभिकरण, उद्यानाचे काम करणे तसेच काही ठिकाणी बेड्स वाढविण्याची सूचना केली आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील नाशिक पूर्व, पंचवटी, नाशिकरोड आणि नवीन नाशिक या चारही विभागातील स्मशानभूमींची पाहाणी केली. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन-कॅप) अंतर्गत मिळालेल्या निधीतून ही सर्व कामे होणार आहेत. सर्वप्रथम आयुक्तांनी पूर्व विभागातील अमरधामची पाहणी केली. तेथील पारंपरिक, गॅस, विद्युत या तिन्ही पद्धतींची पाहणी करुन दुरुस्तीच्या काही सूचना केल्या. सीएसआर अंतर्गत कोणाला देणगी द्यायची असल्यास ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्याचीही सूचना आयुक्तांनी केली.

पंचवटीतील अमरधाममध्ये नव्याने सुरु होणार्‍या विद्युत दाहिनीची पाहणी केली. तसेच गोसावी, लिंगायत समाजाच्या दफनभूमीचीही पाहणी करुन दुरुस्तीच्या सूचना दिल्या. नाशिकरोड येथील दसक स्मशानभूमीची पाहणी केली. पारंपरिक आणि नवीन विद्युतदाहिनीच्या कामाचा आढावा घेतला. नवीन नाशिक विभागातील उंटवाडी स्मशानभूमिचीही पाहणी केली. बेड्सची संख्या वाढवण्याबरोबरच टाईल्स, पिलर्सची त्वरित दुरुस्ती करण्याची सूचना केली. कोणत्याही अमरधाममध्ये प्रवेशद्वार तसेच आतील परिसराचे उद्यानासह सुशोभीकरण करुन वातावरण चांगले ठेवावे, अशी सूचना आयुक्तांनी यावेळी केली.

या पाहणी दौर्‍यात आयुक्तांबरोबर शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, उपअभियंता प्रकाश निकम उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या