Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याDeshdoot News Impact : चौफुलीवरील रस्त्याचे काम सुरु

Deshdoot News Impact : चौफुलीवरील रस्त्याचे काम सुरु

टेहरे । विनोद चंदन Tehre

सटाणा ( Satana )शहरासह बागलाण-मालेगाव तालुक्यातील 26 गावांसाठी प्रमुख केंद्रबिंदू ठरलेल्या मात्र खड्डे, धुळीचे साम्राज्य, वाहतूक कोंडीमुळे दुरवस्था झालेल्या टेहरे-सोयगाव चौफुलीचे अखेर भाग्य उजळले आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

जनतेसह वाहनचालकांच्या रोषाकडे दै.‘देशदूत’ने लक्ष वेधताच या समस्येची दखल घेत अखेर बांधकाम विभागातर्फे चौफुलीवरील खड्डेमय रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रगतीपथावर असलेले काम लवकरच पुर्ण होवून खड्डे व धुळीपासून मुक्तता मिळणार असल्याने जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.

मालेगाव शहरासह परिसरातील रस्त्यांची डागडुजी, डांबरीकरण तसेच सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे मनपासह सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हाती घेण्यात आली आहे. मात्र खड्डे व धुळीच्या साम्राज्याने वेढले गेलेल्या तसेच 26 गावांचा केंद्रबिंदू ठरलेल्या टेहरे-सोयगाव चौफुलीच्या दुरावस्थेकडे मात्र दुर्लक्ष केले जात होते. टेहरे चौफुली सटाणा शहरासह बागलाण व मालेगाव तालुक्यातील 26 गावांमध्ये जाण्यासाठी प्रमुख केंद्रबिंदू ठरला होता. त्यामुळे या चौफुलीवरून दिवसरात्र वाहनांची वर्दळ सुरू असते.

चौफुली व्यापारी केंद्रबिंदू ठरल्यामुळे अनेक व्यापारी प्रतिष्ठाने, उद्योग, हॉटेल्स्, मंगल कार्यालये यामुळे हा परिसर गजबजलेला आहे. सोयगाव व कॅम्प भागासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर जाण्यासाठी चौफुलीवरूनच टेहरेमार्गे महामार्गावर कमी वेळेत पोहचता येत असल्याने या रस्त्याचा वापर देखील कॅम्प, सोयगाव भागातील वाहनचालक मोठ्या प्रमाणात करत असतात. लग्नसराई तसेच खरेदीसाठी नागरीक चौफुलीवर येत असल्याने येथे कायम वर्दळ असते. मात्र खड्डेमय चौफुली व धुळीचे साम्राज्य तसेच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत असतात. या समस्येकडे संबंधित विभागाचे नागरीकांतर्फे सातत्याने लक्ष वेधले जात होते.

जनतेसह वाहनचालकांच्या होत असलेल्या हालअपेष्टांंबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन देत त्यांचे लक्ष वेधले होते. चौफुलीच्या दुरावस्थेमुळे होत असलेल्या जनक्षोभाची दखल घेत अखेर संबंधित विभागातर्फे सिमेंट काँक्रीटीकरण करत रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. या कामामुळे मार्गस्थ होतांना वाहन चालकांना वाहतूक कोंडीसह विविध अडचणींचा सामना करावा लागत असला तरी काम प्रगतीपथावर असल्याने लवकरच सर्व अडचणीतून सुटका होणार असल्याने नागरीकांसह वाहनचालकांतर्फे समाधान व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या