नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते निवृत्ती अरिंगळे हे लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असून आपण कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही व निवडणूक लढविणार व निवडून येणार असा ठाम विश्वास अरिंगळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी निवृत्ती अरिंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आपण कुठल्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार निवडणूक लढविणार असून माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले पाच वर्षांपूर्वीसुद्धा आपण इच्छुक होतो परंतु त्यावेळी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार माघार घेतली होती आता मात्र माघार घेणार नाही व निवडणुकीच्या रिंगणात उतरणार व विरोधकाला पाडणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
देवळाली गाव येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी त्यांनी हा इशारा दिला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच याप्रसंगी अरिंगळे यांना निवडणूक लढविण्यासाठी मदत म्हणून माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष अनिल चौगुले यांनी दहा लाख रुपये व व्यापारी बँकेचे संचालक गणेश खरजुल यांनी सुद्धा दहा लाख रुपये मदत देण्याचे घोषणा केली अशी एकूण वीस लाख रुपयांची मदत अरिंगळे यांना देण्यात येणार आहे.
याप्रसंगी गोरख बलकवडे माजी नगरसेवक जगदीश पवार राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक रोड विभागाचे अध्यक्ष मनोहर कोरडे विक्रम कोठुळे सुनील महाले वाल्मीक बागुल चैतन्य देशमुख,वसंत अरिंगळे, मंगेश लांडगे प्राध्यापक हेमंत कांबळे प्रशांत वाघ आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान निवृत्ती अरिंगळे यांनी निवडणूक लढविण्याचा इशारा देऊन एक प्रकारे बंडच पुकारले आहे त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये पेच निर्माण झाला असून माघारी साठी अद्याप दोन दिवसाचा कालावधी आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व महायुतीचे नेते अरिंगळे यांचे मन वळविण्यात यशस्वी होतात की नाही त्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.