Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखविवाह खर्चातून विकास

विवाह खर्चातून विकास

प्रथा आणि परंपरा काळच्या ओघात बदलत असतात. त्याला विवाहसोहळेही अपवाद राहिलेले नाहीत. विवाह हा दोन कुटुंबांमधील पारिवारिक सोहळा. तथापि विवाहसोहळ्यांनाही आता व्यावसायिक स्वरुप आले आहे. विवाहसोहळ्यांवर लाखो रुपये खर्च करण्याची ज्यांची क्षमता असते त्यांनी तो जरुर करावा असा मुद्दा खर्चाच्या समर्थनार्थ मांडला जातो. तो एकवेळ बरोबर असेलही. तथापि काळ मात्र सोकावतो. ज्यांची खर्च करण्याची क्षमता नाही त्यांनाही त्यांच्या घरचे लग्न धुमधडाक्यात व्हावे असे वाटू लागते. लग्न एकदाच होते असे म्हणत त्या इच्छेला खतपाणीही घातले जाते. प्री आणि पोस्ट वेडिंग शुट, डेस्टिनेशन वेडिंग आणि किमान चार दिवस चालणारे लग्नसोहळे हे सध्याच्या विवाहांचे स्वरुप आहे. प्रसंगी कर्ज घेऊन सुद्धा ही हौस पुर्ण करण्याकडे युवापिढीचा कल वाढतो. हा खर्च कधी परंपरेच्या, कधी हौसेच्या नावाखाली केला जातो. लग्नात हुंडा देणे आणि घेण्याला कायद्याने बंदी आहे. तथापि मुलाच्या कुटुंबाच्या तोलामोलाला आणि नवरा मुलाच्या हुद्याला साजेसे लग्न लावून द्यालच, मुलगी तुमचीच आहे; तिच्यासाठी दागिने तुम्ही करालच अशा पद्धतीने कायद्याला बगल दिली जाते. वरातीचा, डीजेचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा खर्चही मोठाच असतो. विवाहासाठीच्या खर्चाची तजवीज करण्याचा ताण मुलींच्या पालकांवर येणे स्वाभाविक आहे. अशा छुप्या-जाहीर खर्चाला आणि काही परंपरांना फाटा देण्याचा प्रयत्न नाशिक जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींनी केला आहे. त्यासाठी एकमताने ठराव संमत केले आहेत. ज्यांचे पालन करणे ग्रामस्थांना बंधनकारक आहे. सय्यद पिंप्री ही त्यापैकी एक ग्रामपंचायत. लग्नात बांधले जाणारे फेटे, टॉवेल-टोपी आणि शाल देण्यावर या ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे. बँडच्या तालावर वाजतगाजत निघणारी वरात, त्या तालावर धुंद होऊन नाचणारी वर्‍हाडी मंडळी हे बहुतेक लग्नांमधील दृश्य. काही ठिकाणी त्यातुन वादाचे प्रसंगही उद्भवतात. सय्यद पिंप्री गावात नवरदेवाची वरात निघत नाही. गावातील नवरदेव लग्नाच्या आधल्या दिवशी पायी चालत गावातील मारुतीच्या मंदीरात येतो. तेथे संबळ किंवा वाजंत्रीवाला असतो. त्याला ठरलेली किरकोळ रक्कम दिली जाते. नवरदेव देवदर्शन करेपर्यंतच वाजंत्री वाजवली जाते. तेथेच लग्नाची आवश्यक माहिती जाहीर केली जाते. ज्यांची इच्छा असेल त्यांनी टॉवेल-टोपी-नारळाऐवजी नवरदेवाच्या हातात 10 रुपये द्यायचे. अशा रीतीने नवरदेवाकडे जी रक्कम जमा होते त्यातील निम्मी रक्कम मंदीराच्या दानपेटीत अर्पण केली जाते. त्या रकमेचा विनियोग विकासकामांसाठी केला जातो. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीने देखील याकामी पुढाकार घेतला आहे. गावाबाहेर जाऊन विवाह सोहळे करण्याचे आणि त्यासाठी लाखो रुपये खर्च करणार्‍या ग्रामस्थांचे प्रमाण वाढत असल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. त्याला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने गावातच दोन हॉल बांधले आहेत. 11 हजार रुपये भरुन गावातच लग्न करण्याची सुविधा ग्रामस्थांनी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सारासार विचार करुन सद्हेतूने केलेले बदल लोक स्वीकारतात. तसे दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी बदल स्वीकारले आहेत. असा दृष्टीकोन इतर गावांनी स्वीकारला तर अनेक प्रकारच्या अनावश्यक खर्चांना आळा तर बसेलच, पण त्या रकमेतून विधायक कामे होऊ शकतात. त्यातून गाव सुधारू शकते याचा उत्तम धडा दोन्ही ग्रामपंचायतींनी घालून दिला आहे. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या