मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाला चार विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद जिंकले. न्यूझीलंडने भारताला जिंकण्यासाठी २५२ धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाने सहज पार केले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला आणि एकही सामना न गमावता विजेतेपद जिंकले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. चाहते नाचत आणि ढोल वाजवून संघाच्या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. भारताच्या विजयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात संघाचा अभिनंदन प्रस्ताव मांडला. तो ठराव एकमताने मंजूर झाला.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजेतेपदाची ट्रॉफी जिंकल्याबद्दल विशेष अभिनंदन. विशेष यासाठी कारण चॅम्पियन ट्रॉफी टीम इंडियाला अनेक वेळा हुलकावणी देत होती. अखेर २०२५ मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. लागोपाठ ICCच्या दोन स्पर्धा जिंकणारा भारत हा एकमेव देश ठरला”
विधिमंडळात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने आपले वर्चस्व सिद्ध करत ट्रॉफी जिंकली आहे. आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक गौतम गंभीर यांची प्रचंड मेहनत आहे. नेहमीची स्टाईल बदलून रोहितने पिचवर टिकून ७६ धावा काढल्या आणि असंख्य क्रिकेट प्रेमींना ही मोठी भेट आहे.
सभागृहात ठराव मंजूर
“युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या भारताने दमदार कामगिरी केली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी तीन वेळा जिंकणारा भारत हा एकमेव देश ठरला. सध्याच्या भारतीय क्रिकेटमध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत. मी अनेक जणांकडून असे ऐकले की भारताने सध्या अ आणि ब असे दोन संघ बनवले तरीही तेच दोन संघ फायनल मध्ये खेळतील इतके भारतीय क्रिकेट बहरलेले आहे. या चॅम्पियन संघातील खेळाडूंचे मी सभागृहाच्या वतीन मनापासून अभिनंदन करतो,” असे फडणवीस म्हणाले.
अनेक टीकाकार रोहित आणि विराटवर बोलत होते, पण फॉर्म हा टेम्पररी असतो, मात्र क्लास परमनंट असतो, ते विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या कडून पाहायला मिळाले. अनुभवी पण यंग असे खेळाडू दिसले. वरुण चक्रवर्ती हा आपल्या शालेय जीवनात क्रिकेट खेळला पण ते आर्किटेक्ट झाले, पण त्यांच्या रक्तात क्रिकेट होते. त्यांच्या फिरकी पुढे सगळे फेल ठरले. वरुण किंवा कुलदीप यादव यांनी महत्त्वाचे विकेट काढत किवी संघाला अडचणीत आणले. संघाला बांधण्याचे काम केले, काही युवा तर काही अनुभवी असा हा उत्तम संघ होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच, हा अभिनंदनाचा ठराव प्रशस्तीपत्रकाच्या रूपाने चॅम्पियन संघाती प्रत्येक खेळाडूला पाठवावा, अशी विनंतीही त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा