Wednesday, June 26, 2024
Homeराजकीयपंतप्रधान मोदींनी शरद पवारांना 'ती' ऑफर नव्हे तर…; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना ‘ती’ ऑफर नव्हे तर…; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुंबई | Mumbai

- Advertisement -

देशासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकींच्या (Loksabha Election) प्रचारामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दररोज होणाऱ्या छोट्या-मोठ्या सभांच्या प्रचारातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षाचे येण्याचे आव्हान केल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींनी राज्यात घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ‘४ जूननंतर काँग्रेसमध्ये (Congress) विलिन होण्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात सामील व्हा’, असं उद्देशून म्हणत एकप्रकारे खुली ऑफर दिली होती.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही ऑफर शरद पवारांनी धुडकावून लावत त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर आज मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरवर माध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ही दिलेली ऑफर नसून सल्ला आहे. आजपर्यंत पवार साहेबांचे एकूण राजकारण बघितले असता ते जेव्हा स्वत:चा पक्ष कमजोर होतो तेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात. त्यामुळे पवार साहेबांच्या “प्रादेशिक पक्ष येत्या काळात कॉंग्रेसमध्ये विलीन होतील” या विधानाचा अर्थ ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांनाच समजतो. तोच संदर्भ मोदींचा होता त्यांनी कुठलीही ऑफर दिलेली नव्हती”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

तसेच देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या पक्ष फोडण्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटले की, “आम्ही कुणाचं घर फोडत नाही, कुणाचा पक्ष फोडत नाही. पण संधी मिळाली तर सोडतही नाही. जर सोबत येत असतील तर त्यांना का टाळायचं? असे म्हणत फडणवीसांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीची (Shivsena and NCP) परिस्थिती घराणेशाहीमुळे आल्याचे सांगितले. त्यामुळे आता फडणवीसांच्या या टीकेला विरोधक कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या