मुंबई । Mumbai
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनांची खिल्ली उडवल्यानंतर, आता या वादात खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली आहे. “आश्वासनं देऊन ती पाळली नाहीत, हा अनुभव कदाचित फडणवीसांचा स्वतःचा असावा,” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.
पुण्यात ११ जानेवारी रोजी पार पडलेल्या एका जाहीर मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या ‘मोफत प्रवास’ घोषणेवर जोरदार टीका केली होती. अजित पवार यांनी पुणेकरांना मेट्रो आणि बस प्रवास मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. यावर उपरोधिक टीका करताना फडणवीस म्हणाले होते की, “अशा घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं? मी देखील पुण्यातून उड्डाण करणाऱ्या विमानांमधून महिलांना मोफत प्रवासाची घोषणा करणार होतो.” ज्यांची निवडून येण्याची शक्यता नसते, तेच अशा प्रकारची अवास्तव आश्वासने देतात, असेही त्यांनी सुनावले होते.
मुख्यमंत्र्यांच्या या टिकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली. “२०१४ मध्ये सत्तेत येताना प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं, त्याचं काय झालं?” असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. तसेच, गेल्या विधानसभा निवडणुकीत दिलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणाही हवेतच विरल्याची टीका त्यांनी केली. “आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ करून दाखवले होते, मात्र या सरकारला केवळ आश्वासनं देता येतात, अंमलबजावणी करता येत नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यात महायुतीमध्ये एकत्र असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे. अभिनेत्री गिरीजा ओक यांनी घेतलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी दावा केला की, “अजित पवार केवळ बोलतात, मात्र माझे काम बोलते.” त्यांनी पुढे असेही नमूद केले की, मी आतापर्यंत संयम पाळला होता, पण आता दादांचा संयम सुटला आहे. १५ जानेवारीनंतर ते काहीही बोलणार नाहीत, असा सूचक इशाराही फडणवीसांनी यावेळी दिला.
पुणे महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप आणि अजित पवार गट यांच्यात अनेकदा वादाच्या ठिणग्या उडाल्या आहेत. एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांच्या लोकप्रिय घोषणांना ‘केवळ आश्वासन’ ठरवत आहेत, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे दादांच्या मदतीला धावून येत भाजपला त्यांच्या अपूर्ण आश्वासनांची जाणीव करून देत आहेत. या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुण्यातील मतदारांचे लक्ष आता १५ जानेवारीनंतरच्या राजकीय घडामोडींकडे लागले आहे.




