मुंबई । Mumbai
वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी (२ एप्रिल) लोकसभेत मांडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी १२ वाजता नवं वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं जाणार आहे.
या विधेयकावर सभागृहात आठ तास चर्चा केली जाईल, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. दरम्यान, या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करुन थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
वक्फ बोर्ड विधेयकाच्या पार्श्वभूमीवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?”
दुसरीकडं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टसंदर्भात शिवसेना (उबाठा) माजी खासदार विनायक राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले “आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे जे याबाबत आदेश देतील, ते आदेश सभागृहात आमचे खासदार पाळतील. परंतु वक्फ सुधारणा विधेयकाबाबत जी जेपीसी समिती नेमली होती. त्या समितीमध्ये आमचे खासदार अरविंद सावंत यांनी जी भूमिका मांडली होती. त्यांनी जे जेपीसी समितीला सांगितलं होतं. तीच आमच्या पक्षाची भूमिका कायम असेल”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिलीय.