मुंबई | Mumbai
काल जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपप्रणित एनडीएला (NDA) बहुमत मिळाले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर दुसरीकडे काल लागलेल्या लोकसभेच्या निकालात महायुतीला महाराष्ट्रातून १७ जागा मिळाल्या आहेत. यात भाजपला ०९, शिंदेंच्या शिवसेनेला ०७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. त्यामुळे राज्यातून ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे.
त्यानंतर आज मुंबईत भाजपची लोकसभेच्या या पराभवाची कारणे शोधण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या वरिष्ठांनी मला राज्यातील सरकारमधून मोकळ करावं असे म्हणत राज्यातील झालेल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात (Maharashtra) अपेक्षित यश न मिळाल्याने झालेल्या या पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचे (Election) नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो की मी स्वत: यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीस पुढे म्हणाले की, “भाजपाला महाराष्ट्रात सामना कराव्या लागलेल्या स्थितीची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे. आता मला विधानसभेत पूर्णवेळ उतरायचे आहे. त्यामुळे मी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. त्यानंतर पक्षनेतृत्व जे सांगेल, त्यानुसार मी सगळं करणार आहे”, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, सध्या देवेंद्र फडणवीसांकडे महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद व इतर महत्त्वाच्या खात्यांचा जबाबदारी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला या सर्व जबाबदाऱ्यांमधून मोकळं करून राज्यात पक्षाच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेतृत्वाकडे केली आहे.