नाशिक | प्रतिनिधी
दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांचे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. नाशिक शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांत सारडा यांनी भरीव योगदान दिले. सारडा यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सिन्नर व्यापारी बँक, नाशिक जिल्हा सहकारी बँक, जळगाव जिल्हा सहकारी बँक, नाशिक औदयोगिक सहकारी वसाहत (नाईस), नाशिक औदयोगिक कारखानदार संघ (निमा), ऑस्टीम, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विविध संस्थांवर त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. चतुरस्त्र आणि आपल्या निष्ठांवर घट्ट उभे कणखर व्यक्तिमत्व असलेल्या सारडा यांच्या निधनाने नाशिकच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे.
देवकिसनजी सारडा यांच्याविषयी
देवकिसनजी सारडा हे उत्तर महाराष्ट्रातील ‘देशदूत’, ‘सार्वमत’ दैनिकांचे संस्थापक व मार्गदर्शक आहेत. विचारसंपन्न व चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व लाभलेले सारडा शैक्षणिक, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक व औद्योगिक क्षेत्रातील भरीव योगदानामुळे महाराष्ट्रातील एक सक्रिय सेवाभावी कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.
१९५९ साली श्री सिन्नर व्यापारी बँकेची स्थापना करून सारडा यांनी सहकार क्षेत्रात पदार्पण केले. नाशिक, अहमदनगर, सोलापूर व बुलढाणा जिल्ह्यांतील नागरी सहकारी बँका सुरू होण्यास त्यांचा हातभार लागला आहे. १९६३ ते १९६७ या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या शिखर संस्थेचे ते संचालक होते. याच कालावधीत त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आदी संस्थांच्या संचालकपदांवर काम केले आहे. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी मुंबईच्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या नामवंत औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षपदी १९६८ साली सारडा यांची सर्वानुमते निवड झाली.
दिल्लीतील अखिल भारतीय लघुउद्योग महासंघाचे (फासी) ते पूर्वाध्यक्ष आहेत. नाशिक औद्योगिक सहकारी वसाहत (नाईस), नाशिक औद्योगिक कारखानदार संघ (निमा) व महाराष्ट्र लघु व लघुत्तम उद्योग संघ (ऑस्टिम) आदि संस्थांच्या उभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. ‘नाईस’चे ते दीर्घकाळ संचालक होते. ‘निमा’चे ते पूर्वाध्यक्ष होते. औरंगाबादचे मराठवाडा विकास महामंडळ, दिल्लीचे फेडरेशन ऑफ इंडियन एम्प्लॉयर्स, मुंबईचे एम्प्लॉयर्स फेडरेशन ऑफ इंडिया, गुंटूर येथील टोबॅको एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल आदि संस्थांच्या कार्यकारी मंडळावर ते काही काळ सक्रिय सभासद होते.
नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील वसंत व्याख्यानमाला, चित्रकला महाविद्यालय, यशवंत व्यायामशाळा, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आदि संस्थांचे ते पूर्वाध्यक्ष होते. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे दीर्घकाळ सभासद होते. संगमनेरच्या शिक्षण प्रसारक संस्थेने त्यांच्या प्रदीर्घ अध्यक्षीय कार्यकाळात भरीव प्रगती केली आहे. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे ते संस्थापक व सात वर्षे अध्यक्ष होते. सामाजिक कार्याच्या विधायक कल्पना प्रदेश सभेने त्यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या. आळंदी, पंढरपूर, पैठण, त्र्यंबकेश्वर, श्रीनृसिंहवाडी व मोरगाव आदि ठिकाणी आधुनिक सोयींनी युक्त असे भव्य भक्तनिवास प्रकल्प उभारणाऱ्या माहेश्वरी जनकल्याण संस्थानशी प्रारंभापासून सक्रिय संबंधित होते.
सुमारे दोन दशके विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडून ते साली निवृत्त झाले. राष्ट्रीय अंध संस्थेच्या (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइरड) महाराष्ट्र शाखेचे ते संस्थापक व प्रारंभीची सात वर्षे अध्यक्ष होते. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते. पोस्ट व तार खाते, टेलिकम्युनिकेशन सल्लागार समित्या, मध्य व पश्चिम रेल्वेच्या विभागीय सल्लागार समित्या, केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती, प्राप्तीकर, केंद्रीय अबकारी कर या संबंधीच्या विविध सल्लागार समित्यांचे सभासद म्हणून त्यांनी काम केले आहे. लघुउद्योगांच्या विकासासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या ‘सीडबी’ बँकेच्या पहिल्या संचालक मंडळाचे ते सभासद होते. केंद्रीय किमान वेतन सल्लागार मंडळ, लघुउद्योग मंडळ काही वर्षे सभासद राहिले आहेत.
‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ या महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील ख्यातनाम संस्थेच्या उभारणीत सारडा यांचे मोठे योगदान होते. संस्थेच्या संस्थापक विश्वस्त मंडळाचे सभासद व प्रतिष्ठानचे ते उपाध्यक्ष होते. कुसुमाग्रजांनी त्यांना प्रेमाने ‘कार्याध्यक्षपद’ ही बहाल केले होते. ‘जनस्थान पुरस्कार’ हा मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार साहित्यिकांना व विविध सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याबद्दल ‘गोदावरी गौरव’ या मानचिन्हांनी नामवंतांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून सन्मानित केले जाते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रारंभापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी व्यवस्थापक मंडळासह अन्य महत्त्वाच्या समित्यांवर सारडा यांना चार वेळा सभासद म्हणून नियुक्त केले होते. वयाच्या पंचविशीत आर्थिक, सामाजिक, सहकारी, व्यावसायिक अशा अनेक कार्यक्षेत्रातील संघटना व संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा अनुभव त्यांना मिळाला. वृत्तपत्रातील वृत्तांकन वृत्तपत्राच्या धोरणानुसार वा पक्षीय भूमिकेनुसार होते. त्यामुळे ते अनेकदा वास्तवापेक्षा वेगळे असते, असे त्या काळात जाणवल्याने ४ सप्टेंबर १९७० ला गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांनी नाशिकमध्ये दैनिक ‘देशदूत’चा शुभारंभ केला. अगदी अननुभवी सहकाऱ्यांकडे संपादन व व्यवस्थापनाची धुरा सोपवली. दैनिक ‘सकाळ’चे संस्थापक डॉ. ना. भि. परुळेकर यांच्या हस्ते प्रथमांकाचे प्रकाशन झाले होते. वस्तुनिष्ठ वृत्तांकनाचे महत्व त्यांनी भाषणांतून स्पष्ट केले होते. ‘देशदूत’ने ते पथ्य सतत सांभाळावे, असा सारडा यांचा कटाक्ष होता.
१९७३ मध्ये नाशिकच्या नगराध्यक्षपदी डॉ. वसंतराव गुप्ते यांची निवड हे ‘देशदूत’मुळे घडून आलेले मोठे स्थित्यंतर मानले जाते. त्यापाठोपाठ राज्यात व देशात अभूतपूर्व क्रांती घडवणाऱ्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनात ‘देशदूत’ने अविस्मरणीय योगदान दिले. स्व. शरद जोशींनी ‘देशदूत’ला जणू संघटनेचे मुखपत्र मानले होते. वृत्तपत्र क्षेत्रातील उण्यापुऱ्या अर्धशतकी ध्येयवादी योगदानाबद्दल पुण्याच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व एमआयटी शिक्षण समूहाकडून त्यांना ‘आर्य चाणक्य महाराष्ट्र राज्य जनजागरण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



