मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे जबाबदारीची मागणी केली आहे. रायगडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुंडे यांनी थेट मंचावरूनच ‘आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या,’ अशी विनंती केली. मुंडेंच्या या मागणीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांचे तोंडभरून कौतुक केले. ‘सुनील तटकरेंनी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करावे. चुकलो तर कान धरावा,’ असे सांगत त्यांनी तटकरेंना वडिलांच्या भूमिकेत ठेवले. कोकणचा विकासपुरुष म्हणून तटकरेंनी केलेल्या कामाचे त्यांनी स्मरण केले. तटकरे यांना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची सखोल जाण आहे आणि त्यांच्यामुळेच आपण राजकारणात उभे आहोत, असेही मुंडे म्हणाले. तसेच, सुनील तटकरेंनी पक्ष नेतृत्वातही तरुण चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाला एका उंचीवर नेल्याचे मुंडे यांनी नमूद केले.
धनंजय मुंडे यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर अजित पवारांनी सकारात्मक भूमिका घेत, ‘धनंजय मुंडेंच्या विनंतीचा मान राखला जाईल आणि त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल,’ असे म्हटले. अजित पवारांच्या या विधानामुळे धनंजय मुंडे यांना लवकरच पक्षात नवीन आणि मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी काही काळ ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. मात्र, आता पुन्हा एकदा ते पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाले आहेत आणि नवीन भूमिकेची प्रतीक्षा करत आहेत, असे दिसते.





