मुंबई | Mumbai
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी करुणा शर्मा-मुंडे यांना दर महिन्याला २ लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज माझगाव सत्र न्यायालयात (Mazgaon Sessions Court) सुनावणी झाली. यावेळी धनंजय मुंडे यांच्यावतीने वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करतांना करुणा शर्मा यांच्यासोबत धनंजय मुंडेंचे अधिकृत लग्न झाले नसल्याचे म्हटले आहे.
यावेळी मुंडेंचे वकील युक्तिवाद (Argument) करतांना म्हणाले की, “धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा-मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलेले नाही, पण ते मुलांना स्वीकारत आहे. राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत. करुणा शर्मा-मुंडे यांना १५ लाखाच्या जवळपास वर्षाला उत्पन्न आहे. त्या आयकर भरत असून आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. तरी देखील त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे. करुणा शर्मा-मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय असून त्यांना माझ्या पैशांची गरज नाही. त्या स्वतः स्वतःचा खर्च मॅनेज करतात”, असे वकिलांनी कोर्टात सांगितले.
तर करुणा शर्मा-मुंडे यांचे वकील युक्तिवाद करतांना म्हणाले की, “धनंजय मुंडे यांच्यासोबत करुणा शर्मा-मुंडे यांचे १९९८ ला लग्न झाले आहे. या लग्नानंतर त्यांना दोन अपत्य झाली असून त्यांचे एकत्र फोटो आहेत”, असे सांगितले. यानंतर न्यायालयाने करुणा शर्मा-मुंडे (Karuna Sharma-Munde) यांच्या वकिलाला धनंजय मुंडे यांच्यासोबत तुमचे लग्न झाले त्याचे काही पुरावे आहेत का? असे विचारले असता त्यावर करुणा शर्मा-मुंडेचे वकील म्हणाले की, “हे सगळे पुरावे आम्ही सादर करू, त्यासाठी आम्हाला थोडासा वेळ हवा आहे. यानंतर न्यायालयाने (Court) पुढील तारखेपर्यंत आपण पुरावे सादर करा, असे म्हणत पुढील सुनावणी ५ एप्रिलला होईल”, असे म्हटले.