Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDhannajay Munde: पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; म्हणाले, "दादांना सांगितलं होतं की...

Dhannajay Munde: पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; म्हणाले, “दादांना सांगितलं होतं की हे…”

शिर्डी | Shirdi

पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना (Ajit Pawar) सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले आहे. शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवसंकल्प शिबिरात ते बोलत होते. धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

धनंजय मुंडे म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे. पाया पडलो पण दादा म्हणाले, काही होत नाही. सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत. तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरु झालं, असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय या सगळ्या घटनेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साक्षीदार असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांना पक्षातून काढण्यासाठी कोण षडयंत्र रचत होतं, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तुस्थितीची जाणीव असल्याने या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत. आज कुणी निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यु करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे! अजित दादांनी आता बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे, याचा आनंदच असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली स्व.संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे, त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे, याबद्दल धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली .

पक्षात आल्यापासून आजवरच्या वाटचालीत आमचे नेते म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलो. अनेक प्रसंगी अजितदादांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. २०१४ – १९ या काळात विरोधी पक्षनेतेपदी काम केले. पक्षाच्या पडत्या काळात चार वेळा हल्लाबोल, परिवर्तन, शिवस्वराज्य यात्रांमध्ये सहभागी होऊन सबंध महाराष्ट्र पिंजून काढला. तत्कालीन सरकारला वाकवायचे काम केले. सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी चांगले काम करून दाखवले. गाव – वस्त्यांची जाती वाचक नावे बदलणे, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांसारखे अनेक क्रांतिकारी निर्णय त्याकाळात घेतले. ११ हजार कोटी रुपये पीकविमा एका वर्षात मिळवून देणारा कृषिमंत्री मी, मात्र त्यावरूनही टीका झाली. मात्र अर्धवट माहिती देऊन बदनामी करणारे लोक यावर बोलत नाहीत, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो. त्यावेळी बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी जाऊ नकोस अन्यथा पुढे विधानसभेत त्याचा तुला त्रास होईल, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. मात्र तरीही मी गेलो. माझ्यासह अनेकांना विधानसभा निवडणुकीत ठरवून टार्गेट केले गेले. मी माझ्या परळीच्या जनतेच्या आशीर्वादाने एक लाख चाळीस हजार मतांच्या लिडने निवडून आलो, त्याचीच पोटदुखी अनेकांना प्रकर्षाने झाली. ठाण्यात मी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेलो म्हणून तिथले नेते बीडमध्ये येऊन मला टार्गेट करत आहे, हेही उघड झाले. विधानसभा निवडणुकीत मी केवळ ५ दिवस पूर्णवेळ परळीत होतो, उर्वरित वेळेत मी पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, बैठका घेतल्या. त्यातील बहुतांश उमेदवार निवडून आले, असेही मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

मी सतत काम करणारा एक कार्यकर्ता आहे, नेता फक्त नावाला आहे. माझ्यातला कार्यकर्ता कधीच मरणार नाही. मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, पक्ष नेतृत्वाने पाँडिचेरी मध्ये जाऊन पक्ष विस्ताराचे काम कर म्हंटले तर तिथे जाऊन मी काम करेल. पक्षाला सुद्धा कार्यकर्ताभिमुख व्हावे लागेल. कार्यकर्त्याला ताकत देताना संपूर्ण विश्वास देखील ठेवणे आवश्यक आहे, तेव्हाच पक्ष संघटना मजबूत होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारनानंतर झालेल्या मीडिया ट्रायल, सोशल मीडियावरील चिखलफेक, साधलेले राजकारण अशा अनेक गोष्टींनी जिल्ह्याचे सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. आपला पक्ष शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे आता आमच्या बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी सुद्धा सर्वांना घ्यावी लागेल. ऊसतोड करून, कष्ट करून, कोरडवाहू शेती करून जगणारे आम्ही सामान्य लोक आहोत. आमचा जिल्हा बिहार आणि आमची परळी तालिबान नाही. अशीच बदनामी सुरू राहिली तर पुढच्या महिन्यात महाशिवरात्री आहे, बारा ज्योति्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ यांच्या दर्शनाला भाविक येतील का, अशी भीती वाटत असल्याचे सांगून परळीची बदनामी थांबवा असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला. याबाबत माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, एकंदर सद्यस्थिती पाहता, मी स्वत: अजितदादांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दादांनी द्यावी. पुण्याचा जसा विकास झाला तसा दादांकडे उपमुख्यमंत्रिपद असल्यामुळे बीडचाही विकास होईल. बीडची आता जी परिस्थिती आहे, त्यात आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे. दादांकडे द्यायला पाहिजे. सद्यपरिस्थितीत काय निर्णय घ्यायला पाहिजे हे लक्षात घेऊन मी पक्षाला विनंती केली की जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दादांना द्यावी, असे त्यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...