Monday, July 15, 2024
Homeनगरधोत्रे परिसरातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करा - कोल्हे

धोत्रे परिसरातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करा – कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

तालुक्यातील धोत्रे, खोपडी परिसरात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके वाहून गेल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

बुधवारी सायंकाळी धोत्रे, खोपडी व परिसरात जोरदार पाऊस झाला. या धुवाधार पावसाने शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीन, मका आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकर्‍यांनी खरीप हंगामात नुकतीच पेरणी केलेली पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली. शेतातील उभ्या पिकांचे या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सलग अडीच ते तीन तास कोसळलेल्या जोरदार वादळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेतातील उभी पिके जमीनदोस्त तर झाली. त्याशिवाय अनेक लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अन्नधान्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाल्यामुळे ते उघड्यावर आले आहेत.

या अतिवृष्टीचा धोत्रे, खोपडी व इतर काही गावांना मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसाने शेतकर्‍यांच्या शेतातील उभी पिके वाहून गेली आहेत. तसेच समृद्धी महामार्गावरील पाणी शेतकर्‍यांच्या शेतात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हे पाणी महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या शेतात घुसून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. राज्य रस्ते विकास महामंडळाने व संबंधित विभागाने या समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी आपण यापूर्वीच केलेली आहे. यावर्षी समृद्धी महामार्गावरील पाणी शेतकर्‍यांच्या शेतात घुसून त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकार्‍यांना तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या