धुळे –
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थी नोंदणीत धुळे जिल्हा राज्यात दुसर्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांनी आरोग्य विभागाकडे तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
माता व बालकांच्या आरोग्यात सुधारणा होवून माता व बालमृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येत आहे.
प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारणा 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर झाली असेल अशा पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जीवित अपत्यासाठी दिला जातो. या योजनेंतर्गत तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बचत खात्यात जमा केले जाते.
पहिल्या हप्त्यासाठी लाभार्थी महिलेला मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 100 दिवसांच्या आत गर्भधारणा नोंदणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास आणि तिसरा हप्ता प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकास संपूर्ण लसीकरण व व त्या अनुषांगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केला जातो.
जिल्ह्यात 2 ते 8 डिसेंबर 2019 या कालावधीत मातृवंदना सप्ताह राबविण्यात आला. एकूण 28 हजार 403 पैकी 26 हजार 988 लाभार्थ्यांची नोंदणी झाली. त्यानुसार नोंदणीचे 95 टक्के काम पूर्ण झाले. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांपैकी 23 हजार 808 लाभार्थ्यांना 10 कोटी 66 लाख 31 हजार रुपयांचे अनुदान ऑनलाइन पध्दतीने वितरीत करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
धुळे जिल्ह्यातील सर्व पात्र प्रथम खेपेच्या गर्भवती मातांनी आरोग्य विभागातील आशा, एएनएम, कर्मचार्यांकडे त्वरीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी केले आहे.