धुळे | Dhule
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) मंत्रालयात जाहीर करण्यात आली. यामध्ये धुळे महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी निघाले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपाने ५० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवून आपले वर्चस्व सिध्द केले आहे. त्यामुळे आता महापौर पदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
हे देखील वाचा : Jalgoan Mayor Reservation : जळगावात महापौर पदासाठी चुरस; नऊ महिलांपैकी कोणाला मिळणार संधी?
धुळे महापालिकेच्या (Dhule Municipal Corporation) एकूण ७४ जागा असून, त्यापैकी ७० जागांसाठी गुरुवार (दि.१५) रोजी मतदान झाले होते. यानंतर शुक्रवार (दि.१६) रोजी मतमोजणी झाली असता त्यात भाजपने (BJP) ४६ जागांवर विजय मिळवला होता. तर निवडणुकी आधी भाजपच्या चार जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे भाजपचे एकूण संख्याबळ ५० इतके झाले होते. तर शिवसेनेने ५, राष्ट्रवादी काँग्रेसने ८ आणि एमआयएमने १० आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. त्यानंतर आता आरक्षण सोडत जाहीर झाल्याने महापौर पदासाठी भाजपमध्ये चुरस वाढली आहे.
हे देखील वाचा : Mayor Reservation : नाशिक, मालेगाव, धुळे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव; वाचा कोणत्या महापालिकेत कुठले आरक्षण?
भाजपकडून महापौरपदासाठी आठ महिला शर्यतीत आहेत. यात डॉ. निशा महाजन, मायादेवी परदेशी, चित्रा परदेशी, कल्पना महाले, जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, कल्याणी अंपळकर, लताबाई यशवंत सोनार (पोतदार) यांच्या नावांचा समावेश आहे. या अगोदर कल्पना महाले, जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी यांनी महापौरपद भूषविले आहे. तर कल्याणी अंपळकर यांची यापूर्वी उपमहापौरपदी निवड झाली आहे. त्यामुळे डॉ. निशा महाजन आणि मायादेवी परदेशी यांच्यात महापौर पदासाठी रस्सीखेच असणार आहे. परंतु, वरिष्ठ नेते ज्यांचे नाव महापौर पदासाठी सुचवतील तेच खुर्चीवर विराजमान होणार आहेत.
हे देखील वाचा : Nashik Mayor Reservation: आरक्षण सोडत जाहीर होताच महापौरपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत; भाजपकडून कुणाला मिळणार संधी?




