बोराडी | वार्ताहर | Boradi
शेतकऱ्यांच्या (Farmer) नावावर शासनाने पाठवलेला युरिया आणि डीएपी (Uriya and DEF) खताचा बफर स्टॉक शिरपूर तालुक्यातील (Shirpur Taluka) काही वितरकांनी परस्पर काळ्या बाजारात विकून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उपडकीस आला आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी बफर स्टॉक खुला करण्याचे आदेश दिले असतानाच, ही धक्कादायक माहिती समोर आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या प्रकारामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खतांच्या (Fertilizers) टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळावे यासाठी शासनाने धोरणानुसार बफर स्टॉकची निर्मिती केली होती. शिरपूर तालुक्यात हा साठा ११ वितरकांकडे ठेवण्यात आला होता. परंतु, यापैकी काही वितरकांनी शासनाच्या (Government) डोळ्यात धूळ फेकून आणि शेतकऱ्यांच्या गरजांना पायदळी तुडवत, हा राखीव साठा परस्पर विकल्याचा संशय आहे. त्यामुळे अधिकृत यादीतील किरकोळ विक्रेत्यांना खत मिळणार नाही आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते (Bhagyashree Vispute) यांनी बुधवारी बफर युरिया स्टॉक खुला करण्याचे आदेश दिले होते. ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आदेशाला एक दिवस ही न होता गुरुवारी ही माहिती समोर आल्याने कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवण्याचा प्रकार आहे, आता कृषी विभाग या माफिया वितरकांवर काय कारवाई करतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी तीव्र झाली आहे.
युरिया खताची बाजारात विक्री
बाजारात युरिया खत साडेतीनशे ते चारशे रुपये दराप्रमाणे विकले जात आहे. ज्या शेतकऱ्यांना पिकांना खत देणे गरजेचे असल्याने कुठल्याही भावात मिळेल त्या भावात खरेदी करून पिकांना खत देण्याचे काम काही शेतकरी करत आहेत. तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे पैसे नाही ते शेतकरी पिकांना खत कुठून देणार यामुळे वेळेवर पिकांना खत न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. यामुळे ज्या दुकानांवर काळ्या बाजारात युरिया खत विक्री होत आहे. त्या दुकानावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर काही शेतकरी दुकानाची तक्रार वरिष्ठांकडे करतात पण त्या तक्रारीची दखल न घेता तक्रार एकतर्फी निकाली काढत असल्याचे दिसून येत आहे.
हा तर नवीनच फॉर्म्युला
सध्या बाजारपेठेत आता नवीनच फॉर्मुला आला असून ज्या शेतकऱ्यांनी ज्या दुकानावर बियाणे घेतले असेल त्या दुकानावर खत मिळेल असल्याचे शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सध्या युरिया खताची सगळीकडे टंचाई झाली असल्याने बाजारपेठेत काही काही व्यापारी शेतकऱ्यांना माझ्याकडे बियाणे घेतले असेल तर तुला खत मिळेल नाहीतर ज्याच्याकडे घेतले असेल त्याच्याकडे जा असे सांगत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे यामुळे या गोष्टीचा देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.




