साक्री –
साक्री तालुक्यात गटात 134, गणात 175 उमेदवार रिंगणात आहे. आज माघारीच्या दिवशी गटातून 55 तर गणातून 60 उमेदवारांनी माघात घेतली.
साक्री तालुक्यात जि.प.चे 17 गट तर.पं.स. चे 34 गण आहेत. माघारीच्या दिवशी गट आणि गणातील निवडणुक आपल्याला जिंकता यावी म्हणून विरोधी उमेवाराला सोबत घेऊन माघारीची विनंती केली जात होती. त्यामुळे तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी होऊन सायंकाळ उशिरापर्यंत चिंन्ह वाटपाचे काम सुरू होते.
महाविकास आघाडीने जागा वाटप करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,या पक्षांनी आपल्या गट गण मधील प्राबल्य लक्षात घेऊन निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तथापि स्थानिक राजकाणातील हेवेदावे यामुळे काही गट गणात महाविकास आघाडीची बिघाडी झाली आहे. दहिवेल गट काँग्रेसच्या वाटेला गेला असतांना शिवसेनेने
उमेदवार उभा करून त्याला एबी फाँर्म दिल्याने तिरंगी लढत या गट गणात होणार आहे. जि.प. व प.स. निवडणुकीत भाजपा तसेच महाविकास आघाडी यांच्या कार्यकत्यांना उमेदवारीत डावलण्यात आल्याने बंडखोरी करत पक्षातील अधिकृत उमेदवाराला आवाहन दिले आहे. त्यामुळे निवडणूका चुरशीच्या होणार असल्याचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे.
धाडणे गणातून भाजपच्या उमेदवार बिनविरोध
साक्री पंचायत समिती निवडणुकीच्या माघारी नंतर भाजपाने आपले खाते धाडणे गणातून उघडले आहे. पंचायत समिती धाडणे गणातून सौ.रोहिणी सुधीर अकलाडे या एकमेव उमेदवार असल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.महाविकास आघाडीचा जागा वाटपात हा गण शिवसेनेला सुटला होता. पक्ष आणि अपक्ष उमेवारांनी माघार घेतल्याने धाडणे गणातून भाजपाचे सौ.रोहिणी अकलाडे बिनविरोध निवडून आल्याने साक्री पंचायत समितीच्या गणात भाजपाने आपले खाते उघडले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.