शिंदखेडा –
वारंवार छळणार्या प्रियकराचा दुसर्या प्रियकराच्या मदतीने काटा काढणार्या दोघांचा पोलिसांनी छडा लावला आहे. यामुळे तावखेड्याच्या तरुणाचा अकस्मात नव्हेतर खून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे प्रवीण लोटन पाटील (वय 27) याचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडली होती. मयत प्रवीण याचा दोरीने गळा आवळून मृत्यू झाला असावा असा संशय पीएसआय सुशांत वळवी यांना आल्याने प्रवीण याचा मृतदेह धुळे जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. मयताची बहिण सौ. सुषमा भटू पाटील रा. नवागाव हिच्या फिर्यादीवरून 302 व 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीआय दुर्गेश तिवारी यांच्याकडे आला. तपास चक्र फिरवून श्वानपथक, हाताचे ठसे पथकास पाचारण करण्यात आले.
मयत प्रवीण लोटन पाटील हा तावखेडा ग्रा. पं. तीत शिपाई म्हणून काम पहात होता. त्याचे गावातील शीतल पाटील या महिलेशी प्रेम संबंध जुळले. पण प्रवीण हा शीतलचा मानसिक छळ करीत होता. तिने लिहिलेल्या चिठ्ठ्या सोशल मीडियावर व्हायरल करून सदर चिठया शीतलच्या अंगणात टाकत होता. त्यामुळे घरचे लोक वाद घालत होते. प्रसंगी मारहाण ही करीत होते.
दि. 15 फेब्रुवारी 2020 रोजी मयत प्रवीण पाटील याने तिला अनेक वेळा फोन करून रात्रीला शेतात येण्याचा आग्रह करीत होता त्यास शितलने नकार दिला. मात्र प्रवीण याचा सारखा तगादा असल्याने शितलने आपला दुसरा प्रिंयकर संभाजी यशवंत पाटील याला सारा प्रकार सांगितला. त्याने शीतल हिला जाण्यास सांगितले. शौचास जाण्याच्या बहाण्याने शीतल शेताकडे गेली. तिथे अगोदर पोहोचलेला प्रवीण पँट काढून तयारीत होता.
शीतल पोहोचताच त्याने तिला ओढले प्रसंगी दबा धरून बसलेल्या दुसरा प्रियकर संभाजी पाटील याने प्रवीण यास मज्जाव केला. प्रवीण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. संभाजी व प्रवीण यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. शीतल व संभाजी दोघांनी त्याच्या गळ्याभोवती दोरी आवळून त्याचा शेवट केला.
त्याचा मोबाईल, पँंट व कपड्यांची विल्हेवाट लावली आणि प्रवीणचा मृतदेह बापू ओंकार रोकडे यांच्या शेतात टाकला. या संदर्भात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन विश्वासात घेतले असता प्रविणला आम्ही दोघांनीच मारल्याची कबूली दिली.
या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय दुर्गेश तिवारी, सपोनि मनोज ठाकरे, सुशांत वळवी, हेड कॉन्स्टेबल रफीकमुल्ला, पोलिस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी, ललीत काळे, तुषार पोतदार, बिपीन पाटील, मोहन सुर्यवंशी, गोपाल माळी, दीपक भिल, प्रवीण निंबाले, कैलास महाजन, विजय पाटील, प्रियंका उमाळे, तबससुम धोबी यांनी तपास केला.