धुळे –
शहरासह परिसरात गेल्या तीन दिवासांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे दिवसभर गारठा जाणवत असून रात्री तापमानाचा पारा आणखी खाली येत आहे. त्यामुळे शहर गारठले असून थंडीच्या कडाक्यामुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली असून खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. त्यात आज दि. 30 रोजी कमाल तापमान 16.6 अंश सेल्सीअस तर किमान तापमान 6.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. त्यामुळे तीन दिवसांपासून दिवसभर गारठा जाणवत आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडतांना थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर, टोपी, कानपट्टीचा वापर करतांना दिसून येत आहे. गारठ्यामुळे दिवसभर ऊबदार कपडे परिधान करून बसावे लागत आहे. तर सकाळी शाळेत जाणार्या चिमुकल्यांना देखील थंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीचा कडाका वाढलामुळे पहाटे व सायंकाळी शहरातील जिल्हा क्रिडा संकूलाच्या मैदानावर पायी फिरायला येणार्या नागरिकांची चांगलीच गर्दी होवु लागली आहे. तर तरूण मंडळी देखील व्यायाम व खेळाच्या सरावासाठी येताना दिसत आहेत.
ऊबदार कपड्यांना मागणी- थंडीचा चांगलाच कडाका जाणवू लागल्याने उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. स्वेटर, जॅकेट, मफलर, कानटोपी, हातातील पंजे इत्यादींना चांगलीच मागणी वाढली आहे. लहान बालक, शाळकरी विद्यार्थी तसेच महिला वर्गासाठी लोकरीच्या स्वेटरला पसंती दिली जात आहे. तर पुरुषांसह तरुण मंडळीने फॅन्सी टोपी व नवीन ट्रेंडचे जॅकेट व स्वेटरची खरेदीला प्राधान्य दिले आहे.