अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar
तालुक्यातील सारोळा कासार रेल्वे स्टेशन तसेच अकोळनेर येथील ऑईल डेपो परिसरातून रात्रीच्या वेळी रेल्वे ट्रॅकवरील उभ्या असलेल्या मालगाडीच्या टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरीचे प्रकार सुरूच असून, सारोळा स्टेशनवर वारंवार टँकरमधून डिझेल चोरणारी सहा जणांची टोळी रेल्वे पोलिसांच्या क्राईम ब्रँच (सीआयबी) दौंड, पुणे या पथकाने पकडली आहे. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या गावच्या उपसरपंचाचा पती असल्याचे समोर आले आहे.
13 व 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री डिझेल चोरी गेल्याच्या तक्रारीनंतर तपासादरम्यान डिझेल चोरी सारोळा कासार येथील टोळीनेच केली असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार रेल्वे क्राईम ब्रँच (सीआयबी) दौंड, पुणेचे पोलिस निरीक्षक बी. डी. इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण गाढवे, एकनाथ गडधे, आण्णासाहेब पाखरे, रामनाथ केकाण, धनंजय यादव, नगर आरपीएफ युनिटचे दीपक कर्डिले, विठ्ठल खंडागळे यांच्या पथकाने आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
यामध्ये गावच्या उपसरपंचाचा पती टोळी प्रमुख दत्तात्रय शिवाजी लिंभोरे, त्याचा भाऊ प्रमोद शिवाजी लिंभोरे, शुभम गुलाब धामणे, अक्षय आप्पासाहेब ढोरजकर, अक्षय बापूराव कडूस आणि वैभव राजेंद्र धामणे या सहा जणांना 15 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी डिझेल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी ते 66,240 रुपये किंमतीचे 720 लिटर डिझेल जप्त केले.
डिझेल चोरलेले डिझेल रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या वीटभट्टीजवळ लिंभोरेच्या मालकीच्या पिकअपमध्ये प्लास्टिकच्या बॅरलमध्ये ठेवलेले होते. ही टोळी गेल्या अनेक दिवसांपासून हा उद्योग करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मात्र, प्रत्येकवेळी पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी होत होती. आरोपींना 16 नोव्हेंबर रोजी नगरच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या आरोपींची रवानगी नगरच्या सबजेलमध्ये करण्यात आली आहे.




