संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील डिग्रस येथे शाळेत जात असलेल्या नववीतील विद्यार्थिनीवर बिबट्याने अचानक हल्ला करत तिला कपाशीच्या शेतात ओढून नेत असतानाच मामाने तिला वाचवले. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.11) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
डिग्रस येथील शेतकरी सखाराम श्रीराम यांची मुलगी प्रगती उर्फ ज्योती ही गावातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात नववीच्या वर्गात शिकते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती शाळेत निघाली होती. मात्र वाटेत असलेल्या कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक झडप घातली व तिला ओढत शेतात नेले.
नेमकी याचवेळी प्रगतीचे मामा देवराम खेमनर आपल्या मुलाला शाळेत सोडून परतत होते. रस्त्यावरून जात असताना त्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दुचाकीवरून थेट शेताकडे धाव घेतली. सतत हॉर्न वाजवत आणि मोठ्याने आरडा-ओरड करत त्यांनी बिबट्याला घाबरवले. त्यांच्या या धाडसामुळे बिबट्याने मुलीला सोडून पळ काढला. प्रगतीच्या मानेला जखमा झाल्या आहेत.
सध्या तिच्यावर संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर मामांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दिवसेंदिवस बिबट्यांचे वाढते हल्ले ही गंभीर बाब असून, स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
डिग्रस परिसरात विद्यार्थिनीवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर सहायक वनसंरक्षक अमरजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमने घटनास्थळाच्या परिसरात शोधमोहीम राबवली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच दोन बिबटे जेरबंद करण्यात आले. त्यांना संगमनेर खुर्द येथील रोपवाटिकेत हलविण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
– सुभाष सांगळे, (वनपरिक्षेत्र अधिकारी-भाग 3)





