डिग्रस |वार्ताहर|Digras
नगर-मनमाड राज्य महामार्गावरील रखडलेले, अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे रस्ते काम पुन्हा एकदा जीवघेणे ठरले आहे. राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात काल दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी झालेल्या भीषण अपघातात डिग्रस येथील 19 वर्षीय नदीम आदम शेख याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला उमर अब्बास शेख हा तरुण जखमी झाला आहे. या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सायंकाळी नगर-मनमाड महामार्गावर अचानक चक्काजाम आंदोलन केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील नदीम आदम शेख (वय 19) व उमर अब्बास शेख हे दोघे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून राहुरीहून डिग्रसकडे जात असताना डिग्रस फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात नदीम शेख याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. उमर शेख याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर मृत नदीम शेख यांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी नगर-मनमाड राज्य महामार्गावर डिग्रस फाटा येथे अचानक चक्काजाम आंदोलन सुरू केले. जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सुमारे दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी मृत तरुणाच्या नातेवाईकांची समजूत काढत त्यांना धीर दिला.
यावेळी त्यांनी पोलीस प्रशासन तसेच संबंधित रस्ते ठेकेदारांशी मोबाईलवरून थेट चर्चा करत जाब विचारला. राहुरी तालुक्यातील जनतेचा जीव कवडीमोल असल्यासारखी वागणूक अधिकारी व ठेकेदार देत आहेत. वारंवार अपघात होऊनही रस्त्याचे काम रखडलेलेच आहे, असा घणाघात माजी मंत्री तनपुरे यांनी करून नगर-मनमाड राज्य महामार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करावी व रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. अन्यथा येत्या 2 जानेवारी रोजी तालुक्यातील सर्व जनतेला सोबत घेऊन महामार्गावर मोठे आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र मोरे यांनीही प्रशासनावर जोरदार टीका केली. हा राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार? जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. वेळ आली तर जेलमध्ये जाण्याचीही आमची तयारी आहे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. अखेर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विनंतीवरून मृत नदीम शेख यांच्या नातेवाईकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र या दुर्घटनेने नगर-मनमाड महामार्गावरील अपूर्ण व धोकादायक रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासन व ठेकेदारांची उदासीनता आणखी किती काळ राहुरीकरांचे बळी घेणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.




