मुंबई । Mumbai
मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर आज या पेचावर पडदा पडला असून भारतीय जनता पक्षाच्या डिंपल मेहता यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, ही निवड जाहीर होताच मुंबई महानगर प्रदेशात (MMR) पहिला ‘अमराठी’ महापौर नियुक्त केल्याचा आरोप करत मराठी एकीकरण समिती आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ९५ जागांच्या निवडणुकीत भाजपने ७८ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. महाविकास आघाडीच्या काळात शिवसेना (शिंदे गट) ३, काँग्रेस १३ आणि एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला होता. भाजपकडून डिंपल मेहता यांनी महापौरपदासाठी एकमेव अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात कोणताही अर्ज न आल्याने त्यांची निवड निश्चित झाली होती. आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत ७९ मते मिळवत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. यासह मिरा-भाईंदरच्या महापौरपदाची माळ पुन्हा एकदा डिंपल मेहता यांच्या गळ्यात पडली आहे.
डिंपल मेहता यांची निवड होताच शहरात ‘मराठी महापौर’ हवा या मागणीसाठी आंदोलने सुरू झाली आहेत. एमएमआर क्षेत्रात प्रथमच अमराठी महापौर नियुक्त झाल्याने मराठी समाजात तीव्र संताप पाहायला मिळत आहे. मराठी एकीकरण समितीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) समर्थनासह महापालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. “मिरा-भाईंदर हे मूळचे आगरी-कोळी बांधवांचे शहर आहे, त्यामुळे येथे मराठी भाषिक महापौरच असायला हवा,” अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे.
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी या निवडीचा निषेध केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्राद्वारे आपली नाराजी कळवली आहे. “आम्ही गेल्या महिन्याभरापासून मराठी महापौर करण्याची मागणी करत होतो. २०१७ मध्येही डिंपल मेहतांच्या निवडीला आमचा विरोध होता. केवळ आमदार नरेंद्र मेहता यांच्या दबावामुळेच डिंपल मेहतांना दुसऱ्यांदा संधी दिली जात आहे,” असा थेट आरोप देशमुख यांनी केला आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेत आज नवीन महापौरांनी पदभार स्वीकारला असला तरी, मराठी अस्मितेचा मुद्दा आता अधिक तापण्याची शक्यता आहे. आंदोलकांनी आगामी काळात अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून, यामुळे सत्ताधारी भाजपची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.





