दिंडोरी |प्रतिनिधी| Dindori
दिंडोरी (Dindori) तालुक्यातील अवनखेड शिवारात कादवा नदी पात्रात १ ते २ दिवसांचे पुरुष जातीचे नवजात अर्भकाचे (Newborn Male Infant) प्रेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत एक ग्रामस्थ्यांनी दिंडोरी पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली. पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, उपनिरीक्षक अल्ताफ शेख हवालदार कानोज गायकवाड अविनाश आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली. कादवा नदी पात्रात स्मशानभूमीसमोर पाण्यात जांभळ्या रंगाच्या फडक्यात गुंडाळलेले अर्भकाचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसून आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आले.
दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्यापूर्वी ही घटना घडली असून अर्भकाच्या मृतदेहाचा पंचनामा करून पुढील शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार कनोज हे करीत आहेत.याबाबत कुणाला काही माहिती असल्यास दिंडोरी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन दिंडोरी पोलिसांनी केले आहे.





