Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यादिंडोरी लोकसभा मतदार संघ : उमेदवार कोणाचा?

दिंडोरी लोकसभा मतदार संघ : उमेदवार कोणाचा?

नाशिक । विजय गिते Nashik

राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून ही समीकरणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असली तरी त्याची पहिली पायरी ही लोकसभा निवडणुकीसाठीच आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही. अडीच लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक जिल्हा विभागला गेलेला असून एसटी (अनुसूचित जमाती) साठी राखीव असलेल्या दिंडोरीचे प्रतिनिधित्व भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार या करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. पवार याच भाजपच्या उमेदवार राहणार हे निश्चित असले तरी भाजपचा उमेदवार (निवडून येण्यासाठी) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च ठरविणार हे स्पष्ट आहे.

- Advertisement -

लोकसभा असो की, विधानसभा मतदारसंघ यातील उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोण कोणत्या पक्षाकडून लढणार? हे सांगणे सद्यस्थितीतील बदलत्या राजकीय घडामोडीमुळे अवघड झाले आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात उमेदवार कोण आणि कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढेल हे आता तरी सांगणे अवघड होऊन बसले आहे. एकूणच पाहता जो सिटिंग उमेदवार आहे तोच उमेदवार आणि त्याच पक्षाला ही जागा, असे संकेत असतात. दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या डॉ. पवार या लोकसभेत या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.

मात्र, आता अलीकडच्या काळात राज्यातील स्थित्यंतरातून भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट हे सध्या महायुतीत एकत्रित आले आहेत. त्यामुळे आपसूकच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत. या मतदारसंघातून डॉ. पवार यांनाच भाजपाकडून उमेदवारी मिळेल, असे सध्याचे राजकीय चित्र आहे. त्यातच नव्याने सामील झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार देणार का? याकडेही लक्ष वेधले गेले आहे. शिंदे गटाचीही यामध्ये भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

हा झाला महायुतीचा भाग. विरोधात काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचीही भूमिका यामध्ये महत्वाची ठरणार आहे. ही जागा गत दोन निवडणुकांचा विचार करता भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत झालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून शरद पवार की, शिवसेना उद्धव ठाकरे गट आपला उमेदवार देणार की, काँग्रेसला पुन्हा्ग जुने दिवस आठवणार? याकडे लक्ष वेधले गेले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

राष्ट्रवादीच ठरवणार भाजपाचा उमेदवार

महायुतीच्या निर्णयात जर ही जागा भाजपलाच सोडण्याबाबत एकमत झाले तरी अजित पवार आणि छगन भुजबळ हेच भाजपचा उमेदवार (निवडून येण्यासाठी) कोण ते ठरवणार, अशी शक्यता आहे. कारण जिल्ह्यावर आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्येही सध्या राजकीय परिस्थिती पाहता अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे या उमेदवारीबाबत त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. यातही डॉ. भारती पवार यांचा मार्ग सुकरच होईल, अशी चिन्हे आहेत. कारण यापूर्वी डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी केलेली असून त्यांचा संपर्क भुजबळ आणि अजित पवार यांच्याशी चांगला राहिलेला आहे. महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडेही आता लक्ष राहणार आहे.

राष्ट्रवादीने गतवेळी धनराज महाले यांना उमेदवारी दिली होती. मात्र, निवडणुकीत हार झाल्याने महाले हे पुन्हा शिवसेनेत आणि आता शिंदे गटात डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा कसा विचार होतो, यावरही अवलंबून राहणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कळवणचे आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण गायकवाड, दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर अशी यादी असून यातून कोण कोणता झेंडा हाती घेणार? की उमेदवारी मिळाली नाही म्हणून ऐनवेळी पक्ष बदलून निवडणूक लढवणार? याकडेही आता लक्ष राहणार आहे.

भाजप वर्चस्व राखणार का?

सध्याचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी मालेगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. सन 2008 मध्ये नव्याने निर्माण झालेला दिंडोरी मतदारसंघ आणि पूर्वीचा मालेगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये आतापर्यंत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. येथून काँग्रेसचे सात वेळा, भाजपाचे पाच वेळा खासदार झालेले आहे. तर जनता दलातर्फे दोनदा, जनता पक्षाचा एक आणि प्रजा सामाजिक पक्षाचा एक असे खासदार निवडून गेलेले आहे. अलीकडच्या काळात या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व राखले असून हे वर्चस्व आता भाजपा सलग पाचव्यांदा राखणार का? याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

माकपच्या भूमिकेकडे लक्ष

या मतदारसंघातील काही भागात माकपचेही प्राबल्य आहे. माकपचे माजी आमदार जे. पी. गावित हेही माकपकडून निवडणूक लढवणार की, कोणाला पाठिंबा देणार याबाबत त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या