अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
वर्षाचा सण असणार्या दिवाळी आणि लक्ष्मीपूजन मंगळवारी सायंकाळी घरोघरी उत्साहात पारपडले. घरात लक्ष्मीचा वास, अंगणी दिव्यांची आरास या प्रमाणे नगरशहरासह ग्रामीण भागात दिवाळी उत्साही वातावरणात पारपडली. महिनाभरापूर्वी झालेली अतिवृष्टी आणि पूर यातून सावरून नगरकरांनी उत्साहात दिवाळीसणासाठी खरेदी करत प्रकाशाचा उत्सव साजरा केला. दरम्यान, दिवाळी खरेदीसाठी गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाजारपेठे ग्राहकांची धामधूम दिसून आली. नवीन कपडे, विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य, मिठाई, फुले, पूजा साहित्यासह अन्य ठिकाणी गजब दिसून आली.
सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साह, जल्लोष आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. प्रकाशाचा हा सण केवळ दिव्यांची आरास, फराळ आणि आनंदापुरता मर्यादित नसून, तो कृतज्ञतेचा आणि शुभारंभाचा दिवस आहे. दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि एकोप्याचा सण. या काळात प्रत्येक घरातून फराळाचा सुगंध दरवळतो, आकाश कंदील, तोरणं आणि दिव्यांची आरास सगळीकडे झळकते. या काळात कुटुंब, नातं आणि प्रेम यांचं बंधन अधिक दृढ होतं. वसुबारस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या प्रत्येक दिवसाला वेगळी परंपरा आणि भावनिक अर्थ असतो.
दिवाळीतील पाच दिवसांच्या या उत्सवात लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक देवी लक्ष्मीची आराधना करून सुख, समृद्धी आणि वैभवाची प्रार्थना करतात. पंचांगानुसार आश्विन अमावास्या म्हणजेच 21 ऑक्टोबर 2025 (मंगळवार) रोजी लक्ष्मीपूजन रोजी साजरा करण्यात आला. अमावास्या तिथी सोमवार 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.44 वाजता सुरू झाली आणि 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.54 वाजता संपली. यादरम्यान लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा संध्याकाळी 6.10 ते रात्री 8. 40 या वेळेत होता. या काळात लक्ष्मीपूजन उत्साहात पारपडले.
दरम्यान, मंगळवारी सकाळपासून नगरच्या बाजारपेठेत विविध बाजारपेठांमध्ये खरेदीची धूम होती. नवीन कपडे, मिठाई, विविध फुले, हार, विजेची तोरणे आणि उपकरणे आणि फटाका बाजारपेठ ग्राहकांनी गर्दी करत खरेदीचा आनंद लुटला. सायंकाळी अंधार होताच सर्वत्र पणत्या आणि आकाश कंदील यामुळे अंधाराचे साम्राज्य कमी होवून प्रकाशाने उजळ्ल्याचे दिसून आले. लक्ष्मीपूजनानंतर आकाशात विविध रंगी फटाक्यांची आतिषबाजी करत सर्वांनी आनंद साजरा केला.
आकर्षक रांगोळी, पणत्यांचा मंद प्रकाश
मंगळवारी दिवाळीतील सर्वात महत्वाचा असणार्या लक्ष्मीपूजनापूर्वी नगर शहरातील प्रत्येक घरापुढे आकर्षक रांगोळ्या काढतांना गृहीणीवर्ग व्यस्त होता. सायंकाळी घरासमोर शेणाचा सडा, आकर्षक रांगोळी आणि त्यात पणत्यांचा मंद प्रकाश यामुळे परिसर उजाळून निघाला होता.





