Monday, May 20, 2024
Homeब्लॉगप्रदूषणामुळे वेगाने वाढताहेत आजार

प्रदूषणामुळे वेगाने वाढताहेत आजार

वायू प्रदूषणामुळे हृदय आणि फुफ्फुसांप्रमाणेच शरीरातील इतर अवयवांवरही वाईट परिणाम होत असल्याचे एका नव्या संशोधनात आढळले आहे. हवेतील सूक्ष्म कण आणि नायट्रोजन डाय ऑक्साईड शरीरात जाऊन मेंदूशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत. पीएम 2.5 कण आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळे मज्जासंस्थेचे विकार, श्वसनसंस्था, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार, नैराश्य हे त्रास वाढत आहेत.

जगात असा क्वचितच एखादा देश असेल जिथे प्रदूषणाची समस्या नाही. वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. वायू प्रदूषणामुळे हृदय आणि फुफ्फुसांप्रमाणे इतर अवयवांवरही वाईट परिणाम होतो, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. ‘जनरल फ्रंटियर्स अ‍ॅण्ड पब्लिक हेल्थ’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनातून वायू प्रदूषणामुळे मानवी शरीरावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. शास्त्रज्ञांनी या संशोधनात इंग्लंडमधील 3 लाख 64 हजार लोकांचा समावेश केला होता. अधिक काळ वायू प्रदूषणासोबत संपर्क आल्यास त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याचे निरीक्षण या संशोधनात करण्यात आले. हवेतील सूक्ष्म कण आणि नायट्रोजन डाय ऑक्साईड शरीरात जाऊन हृदय आणि मेंदूशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) मध्ये हवेतील सूक्ष्म कण मोजतात. पीएम 2.5 आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळे मज्जासंस्थेचे विकार, श्वसनसंस्था, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार वाढत आहेतच पण नैराश्य, चिंता या समस्यांमध्येही वाढ होत आहे.

ताज्या संशोधनात आढळून आले की, जास्त रहदारी असलेल्या भागात वायू प्रदूषणाची पातळी वाढते आणि तिथे राहणार्‍या लोकांना जास्त त्रास होतो. अधिक वायू प्रदूषणामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. याबाबत माहिती मिळवण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचे संशोधकांनी सांगितले,

- Advertisement -

यामध्ये 40 ते 69 वयोगटातील 1.5 दशलक्ष नागरिकांच्या जेनेटिक्स, जीवनशैली आणि आरोग्यविषयक माहिती समाविष्ट करण्यात आली होती. या तपासणीत वायू प्रदूषणामुळे होणार्‍या 36 शारीरिक आणि पाच मानसिक समस्या समोर आल्या आहेत. वायू प्रदूषण अधिक असणार्‍या भागात राहणार्‍या नागरिकांना आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचा धोका अधिक असल्याचे या संशोधनात आढळून आले. गंभीर स्वरुपाचा अस्थमा, हार्ट फेल्युअर तसेच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असल्याचे उघड झाले. या संशोधनाच्या आधारे डॉक्टरांनी नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी मास्क वापरावा आणि स्वच्छ हवेसाठी घर आणि आजूबाजूच्या परिसरात अधिक झाडे लावावीत, असे सांगण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर बदलत्या पर्यावरणाचा साकल्याने विचार होणे आवश्यक आहे. आज जागतिक तापमानवाढ आणि बदलते हवामान, प्रदूषण आणि जैवविविधतेचा र्‍हास अशा तीन मुख्य पर्यावरणविषयक समस्या जगापुढे आहेत, असे म्हणता येईल. पर्यावरणविषयक समस्या या निसर्गनिर्मित आहेत असे वाटत असले तरी प्रत्यक्षात त्या मानवनिर्मित आहेत. माणसाच्या पर्यावरणातल्या वाढत्या हस्तक्षेपामुळे या समस्या निर्माण झाल्या असून आता त्या अतिगंभीर बनल्या आहेत. संपूर्ण जगभरातच हवामानबदल, प्रदूषण या समस्या भेडसावत आहेत. भारतातही या समस्या आहेत. मात्र त्यासोबतच भारताच्या काही समस्या वेगळ्या आहेत. वाढती लोकसंख्या हा भारताचा सर्वात मोठा प्रश्न आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकरण, वाढती वाहन संख्या आणि वाढते विकास प्रकल्प ही प्रदूषण वाढण्यामागची प्रमुख कारणे आहेत. वाढते शहरीकरण तर गरजेनुसार झाले. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले. वाढत्या सुखसोयींच्या हव्यासापायी वाहन संख्या वाढली. विकास प्रकल्प मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र हे सगळे करत असताना आपण पर्यावरण, प्रदूषणाची फारशी काळजी घेतली नाही. दरवर्षी जागतिक लोकसंख्येत जवळपास आठ ते साडेआठ कोटींची भर पडते आहे. लोकसंख्या वाढत असली तरी पृथ्वीवरचे नैसर्गिक स्रोत मर्यादित आहेत. हे नैसर्गिक स्रोत वाढत्या लोकसंख्येला पुरेनासे झाले आहेत. येत्या काळात परिस्थिती अधिक बिकट बनणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

पूर्वी शहरांच्या आजूबाजूला सगळी शेती होती. पण वाढत्या शहरीकरणामुळे आजूबाजूची सगळी शेती नष्ट झाली. त्यानंतर शेतीच्या पलीकडच्या जंगलांवर अतिक्रमण झाले. हीच परिस्थिती महाराष्ट्रात सगळीकडे आहे.

भारतात फक्त पाच टक्के संरक्षित वनक्षेत्र आहे. येत्या काळात खासगी वने नष्ट होऊन नियम आणि कायद्यांमुळे फक्त संरक्षित वनक्षेत्रच उरेल असे तज्ञांचे मत आहे. आता उदाहरण द्यायचे झाले तर जगामध्ये दर माणशी सरासरी भूक्षेत्र एक हेक्टर इतके आहे. कॅनडासारख्या देशात हेच क्षेत्र 14.2 हेक्टर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 7.6, अमेरिकेत 7.3 आहे तर भारतात अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. कारण जागेपेक्षा माणसांची संख्या जास्त आहे. भारतात दर माणशी सरासरी 0.16 हेक्टर एवढीच जमीन आहे. लोकसंख्यावाढ पर्यावरणाला कशी घातक ठरू शकते, हे यावरून अपल्या लक्षात येईल.

भारतात शहरांची वाढ अमर्यादित आहे. नवनवी शहरे वसवली जात आहेत त्या शहरांचा विकास आणि विस्तार होत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पश्चिम घाट हा पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असा भाग आहे. या भागाला जागतिक महत्त्व आहे. अशा भागातही शहरीकरण वेगाने होताना दिसत आहे.

डोंगरउतारावरची अनेक जंगले काढून टाकून तिथे आपण शहरीकरण केले आहे. तिथे पंचतारांकित शहरे तयार केली आहेत. अशा पद्धतीने शहरीकरण झाले तर पर्यावरणाचा र्‍हास अटळ आहे. शहराचा विस्तार झाल्यावर सांडपाणी, कचर्‍याचा प्रश्न उपस्थित होतो. नव्या शहरांचे सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते. यामुळे नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अतिगंभीर बनला आहे आणि याचा कोणी विचारही करताना दिसत नाही. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याकाळात देशातील 60 टक्के जनता खेड्यात राहत होती. पण आज परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे. शहरीकरणासोबतच औद्योगिकीकरणाचा वेगही वाढला आहे. पूर्वी आपल्याकडे फारसे औद्योगिकीकरण नव्हते. पण जागतिकीकरणानंतर हा वेग प्रचंड वाढला आहे. आज उद्योगांमध्येही इंधन म्हणून पेट्रोल आणि डिझेल वापरले जाते. यातून कार्बन डाय ऑक्साईडसारखे घातक वायू वातावरणात मिसळत आहेत. कार्बन डाय ऑक्साईड जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणारा वायू आहे. या सगळ्या विषारी वायूंमुळे हवेच्या प्रदूषणात भर पडली आहे. वायू प्रदूषणाला वाहनांची वाढती संख्या जबाबदार आहे. आज भारतात 30 कोटींपेक्षा जास्त वाहने आहेत असे सांगितले जाते. आता प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. ही वाहने वापरणार्‍यांना सवलती दिल्या जात आहेत. अर्थात, यामुळे विजेची मागणी वाढणार आहे. आपल्याकडे वीज तयार करण्यासाठी दगडी कोळसा जाळला जातो. दगडी कोळसा जाळल्यानंतर कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो आणि हा हवेत मिसळतो. त्यामुळे फक्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे पुरेसे नाही. त्याऐवजी वाहन संख्येवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. पेट्रोल आणि डिझेलचेही रेशनिंग व्हायला हवे. वाहनांची संख्या वाढल्यावर रस्ते विकासाचे, महामार्ग बांधण्याचे काम हाती घेतले जाते. आज भारतात अनेक ठिकाणी रस्ते विकास प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या वाढीला आपणच जबाबदार आहोत. रस्ते विकासासाठी झाडांचा, जंगलांचा प्रचंड विनाश सुरू आहे. रेल्वेमार्ग विस्तारण्यासाठी अनेक ठिकाणी जंगलेही उद्ध्वस्त केली गेली आहेत. आता वातावरणात सोडला जाणारा कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्याचे काम वृक्ष करत असतात. पण यांची संख्या आपण कमी करत चाललो आहोत. प्रदूषण कमी करणारे नैसर्गिक स्रोत आपण नष्ट करत आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या