मुंबई | Mumbai
महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aaghadi) असताना २०२० मध्ये दिशा सालियानचे मृत्यू प्रकरण परत एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी (Father) याचिका दाखल केली असून आपल्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचे त्यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, “दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती, ती अशी आत्महत्या करणे शक्य नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असे मला त्यावेळी भासवण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे”,असे ते म्हणाले आहेत.
तर “माजी महापौर किशोरी पेडणेकर, मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी ते सांगत असलेली गोष्ट खरी असल्याचे सतत रेटत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवले होते, आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती. मुंबई पोलिसांनी दिशाचा सामुहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्या”, असेही याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, सदर घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) वरीष्ठ पोलीस अधिका-यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोनकॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचाही मृत्यू झाला. याच कालावधीत रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी ४४ वेळा फोनवर बोलणं केल्याचा आरोपही याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
तसेच “दिशाचा मृतदेह (Dead Body) बंद दाराआडून हलवून तो बाहेर फेकण्यात आला. तिने १४ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलाचा दावा केला गेला. मात्र दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या. गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) दिशाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात ५० तासांचा उशिर केला”, असेही याचिकेत म्हटले आहे.