नाशिक रोड । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपलेली असतानाच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी येथील महसूल आयुक्त कार्यालयात शिंदे व ठाकरे गट पुन्हा आमने सामने आले व दोन्ही गटाने एकमेकासमोर घोषणाबाजी केल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता .पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला .
लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच संपन्न झाले या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी बाजी मारून राजाभाऊ वाजे हे विजयी झाले आहे. हा पराभव महायुतीच्या कार्यकर्त्यांना चांगला जिव्हारी लागलेला दिसतो आहे. परिणामी आज नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ठाकरे गटाच्या वतीने संदीप गुळवे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर महायुतीच्या वतीने शिंदे गटाचे किशोर दराडे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता दोन्ही गट समोरासमोर आल्याने घोषणायुद्ध सुरू झाले.
परंतु वेळीच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने मोठा वाद टळला. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, खासदार माजी खासदार हेमंत गोडसे तसेच विजय करंजकर, राजू लवटे आदी उपस्थित होते. मात्र घोषणायुद्ध होण्यापूर्वी विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर तसेच विलास शिंदे हे नुकतेच महसूल आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर पडले होते.