नाशिक | प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याप्रकरणी आरोपी समीर भालचंद्र गोंदके (वय १९) याला जिल्हा न्यायालयाने आजन्म कारावासासह दहा हजारांच्या दंडाची शिक्षा गुरुवारी (दि. १) ठोठावली. ही घटना २१ ऑक्टोबर २०२० रोजी घडली होती.
आरोपी समीर याने आर्थिक वादातून धनंजय तुंगार (वय ४६, रा. पाचअळी, ता. त्र्यंबकेश्वर) यांच्यावर हल्ला करीत निघृण खून केला होता. मानेत खुपसलेल्या चाकू तसाच सोडून समीर पसार झाला होता. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल होता. तपास तत्कालीन उपविभागीय अधिकारी भीमाशंकर ढोले यांनी करुन दोषारोप पत्र दाखल केले होते.
खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायधीशांसमोर झाली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी २० साक्षीदार तपासले. चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. यातील एक साक्षीदार फितूर झाला. सीसीटीव्ही फूटेज, वैद्यकीय अहवाल, डीएनए या आधारे आरोपी समीरविरोधात आरोप सिद्ध झाल्याने त्यास जन्मठेपेची शिक्षा व दहा हजारांचा दंड ठोठावला.
तुंगार कुटुंबात वर्षभरात तिघे निवर्तले
त्र्यंबकेश्वर येथील स्वातंत्र्य सैनिक, माजी नगराध्यक्ष यादवराव लक्ष्मण तुंगार यांचे मार्च २०२० मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले होते. यानंतर काही महिन्यांनी त्यांचा मुलगा व धनंजय तुंगार यांचा भाऊ शेखर तुंगार यांचे आकस्मिक निधन झाले होते. शेखर यांच्या निधनानंतर बाराव्याचा विधि सुरू असतानाचा धनंजय तुंगार यांना फोन आला होता. त्यानंतर ते ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या अहिल्या धरणाकडे गेले. त्यावेळी आरोपी समीर याने त्यांच्यावर हल्ला चढवून हत्या केली होती. पसार झाल्यावर समीरने वडापाव खावून थेट त्र्यंबकेश्वर पोलिसांत दाखल होत सरेंडर केले होते.
निमसेंचा निर्णय लांबला
नांदूर नाका येथील राहुल धोत्रे खूनप्रकरणी संशयित व भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या जामीनावरील सुनावणी आता ८ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे निमसे यांचा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला आहे. या प्रकरणात गेल्या साडेतीन महिन्यांपासून कारागृहाच्या न्यायालयीन कोठडीत असून जामीन अर्जावर गुरुवारी (दि.१) जिल्हा न्यायालयात सुनावणी होती. यावेळी निमसे यांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी मुंबईतील विधीज्ञ आले होते. या विधीज्ञांनी न्यायालयात बाजू मांडताना, निमसे हे प्रत्यक्ष घटनास्थळी नव्हते व ते वाद मिटविण्यासाठी गेल्याचा युक्तीवाद केला. न्यायालयात पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले.





