अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाही. मी महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव माझ्यासमोर आला नव्हता. जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात, हेच कळत नाही. माझ्या माहितीनुसार राज्य सरकारसमोर नगरसह राज्यातील कोणत्याच जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव नाही, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
नगरमध्ये शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, राज्य सरकारसमोर नगर जिल्हा विभाजनाचा कोणता प्रस्ताव आलेला नाही. मी महसूल मंत्री असतानाही असा कोणता प्रस्ताव नव्हता. मात्र, असे असताना जिल्हा विभाजनाच्या चर्चा कोण उडवते हेच कळत नाही. जलजीवन योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याच्या खा. नीलेश लंके यांच्या आरोपावर उत्तर देताना मंत्री विखे म्हणाले की, केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘हर घर जल योजने’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. या कामात काही त्रुटी, उणीवा असून शकतात. यामुळे या योजनेत भष्ट्राचार झाला, असा आरोप करणे चुकीचे आहे. राज्यातील जनतेने पाणी पुरवठा विभागासाठी मंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ते या विभागाचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहेत. मात्र काही लोकांना कामच राहिले नाही. यामुळे ते जनतेमध्ये राहण्यासाठी ओढून-ताणून आरोप करत आहेत. जनतेने त्यांना नाकारलेले असून त्यांचा कार्यकाळ आता संपत आला असल्याची टीका मंत्री विखे पाटील यांनी खासदार लंके यांच्यावर केली.
केंद्र सरकारने स्वामित्व योजनेच्या माध्यमातून क्रांतिकारी पाऊल उचलत महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील खेडे विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्य सरकारच्या सुधारित वाळू धोरणातील बदलावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, या विभागाचे नवीन मंत्री यांच्याशी माझी सुधारित वाळू धोरणावर चर्चा झाली होती. राज्यात वाळू धोरण अधिक प्रभावी कसे करता येईल, त्यात त्रुटी राहणार नाहीत, यासाठी नवीन मंत्री प्रयत्नशील असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
जिल्हा बँकेत पारदर्शक कारभार
जिल्हा बँकेच्या कारभार पारदर्शक असून देश पातळीवर बँकेचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. तसेच बँकेची भरती योग्य पद्धतीने सुरू असून काही लोक बँकेची बदनामी का करत आहेत, असा सवाल करत जिल्हा बँकेच्या कारभार आणि भरती प्रक्रियेचे समर्थन विखे पाटील यांनी यावेळी केले.
‘स्थानिक स्वराज्य’ महायुती म्हणून लढणार
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत. दिल्लीचे आपचे माजी मुख्यमंत्री यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ज्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तुरूंगवास भोगावा लागला, त्यांनी दुसर्यावर आरोप करू नयेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.