Saturday, July 27, 2024
Homeनगरजिल्हा विभाजनाचे पंतप्रधानांना साकडे घालणार - खा. लोखंडे

जिल्हा विभाजनाचे पंतप्रधानांना साकडे घालणार – खा. लोखंडे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मिळाले. घाटमाथ्यावरील 115 टीएमसी पाणी पुर्वेकडे आणण्यासाठी तसेच शिर्डीत आयटी पार्क व एम्स हॉस्पिटल आणि स्मार्ट सिटी आदी प्रकल्पांबरोबरच जिल्हा विभाजनाची मागणी खा. सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. याबाबत पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचेही आपण लक्ष वेधणार असल्याचे खा. लोखंडे यांनी सांगितले.

- Advertisement -

शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना खा. लोखंडे यांनी सांगितले, 2014 साली शिर्डी लोकसभा निवडणूक लढवताना निळवंडेचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना देण्याचा शब्द दिला होता. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उमा भारती यांचे मोठे सहकार्य मिळाले. महसूलमंत्री विखे पाटील, आ. बाळासाहेब थोरात, आ. आशुतोष काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभव पिचड यांनीही या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केला होता. 1970 सालापासून राज्यात 17 मुख्यमंत्री झाले मात्र निळवंडेच्या लाभक्षेत्रात पाणी आले नसल्याने लोकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आता संपुष्टात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 रोजी शिर्डी दौर्‍यावर असून जिल्हा विभाजनाच्या प्रश्नावर आपण पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना साकडे घालणार आहे. शिर्डीत शेती महामंडळाच्या जागेवर आयटी पार्क निर्माण केल्यास लाखो तरुणांना रोज़गार उपलब्ध होईल. त्यासंबंधी तसेच शिर्डीत एम्स हॉस्पिटल निर्माण बाबतचे निवेदन पंतप्रधान मोदींना देणार असल्याचेही खा.लोखंडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहाणार असून त्याचे नियोजन करण्यात आल्याचे खा. सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. घाटमाथ्यावरील 115 टीएमसी पाणी अडवून ते पुर्वेकडे वळवल्यास नगर जिल्ह्यासह नाशिक मराठवाड्याचा पाणी प्रश्न निकाली लागणार आहे. 2005 च्या काळ्या कायद्याला हाच योग्य पर्याय आहे. त्यासाठी आपण पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांना निवेदन देणार असल्याचे खा. सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, विजय काळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या