Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्ह्यात 575 मतदान केंद्र वाढणार

Ahilyanagar : जिल्ह्यात 575 मतदान केंद्र वाढणार

राज्य निवडणूक आयोगाला आढावा सादर || गरज भासल्यास मतदान यंत्राची मागणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मतदानाची प्रक्रियेला गती देऊन जास्तीत-जास्त मतदारांनी सहभागी होण्यासाठी आठशे ते नऊशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून केली जाणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 3 हजार 132 मतदान केंद्र होती.

- Advertisement -

ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत 3 हजार 705 प्रस्तावित करण्यात आली आहेत. नगर जिल्ह्यात आगामी निवडणूकांसाठी जवळपास 575 मतदान केंद्र वाढणार असल्याचा अंदाज निवडणूक प्रशासनाला आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी राज्य निवडणूक आयोगाला जिल्ह्यातील आगामी निवडणुकीच्या अनुशंषाने आढावा सादर केला आहे. यावेळी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आधी केंद्र निश्चित करा. त्यानूसार गरज भासल्यास मतदान यंत्रांची मागणी करण्यात यावी, अशी सुचना राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

YouTube video player

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जिल्ह्यातील मतदारांची संख्या 29 लाख 74 हजार 18 होती. त्यानंतर मतदारांची नवीन नोंदणी वाढत आहे. 1 जुलै 2025 अखेर जिल्ह्यातील मतदारांची संख्या 30 लाख 6 हजार 816 झाली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात असणार्‍या मतदान केंद्राची संख्या ही 3 हजार 132 होती. त्यात आता वाढ प्रस्तिावित करण्यात आली असून येणार्‍या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्याही 3 हजार 705 होणार आहे. यासह जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे दोन गट तर पंचायत समितीचे चार गण वाढणार आहेत.

कर्जत आणि जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेचा प्रत्येकी एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढणार आहे. इतर तालुक्यात जैसे-थे परिस्थिती राहणार आहे. भूसंपादन अधिकारी गौरी सावंत यांच्याकडे महसूल उपजिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यांच्याकडे प्रारूप मतदारसंघ तयार करण्याची जबाबदारी आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वेळोवेळी आढावा घेतला जात आहे.

मतदान केंद्रावर मतदान रांगेत जास्त वेळ उभे रहावे लागत असल्याच्या कारणातून काही मतदार मतदावाकडे पाठ फिरवित आहेत. लोकसभा- विधानसभा निवडणुकीत सरासरी 50-60 टक्केच मतदान होते. मतदारांना मतदान केंद्रावर जास्त वेळ उभे राहावे लागू नये, तत्काळ मतदानाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आता आठशे ते नऊशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मतदान केंद्रात मतदार गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासांच्या आत त्याची मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.

महसूल मंडलात गावांचा समावेश
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. अनेक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आपला मतदारसंघ गृहित धरून गावातील सुख-दुःखाच्या प्रसंगात उमेदवार हजेरी लावत आहेत. आपल्याला अनुकूल असलेल्या गावे इतर मतदारसंघात जाऊ नये, यासाठी ही गावे जवळच्या महसूल मंडलाला जोडावीत, असे पत्र महसूल प्रशासनाला देत आहेत.

14 तारखेला प्रारूप प्रभाग रचना
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सध्या प्रारूप मतदारसंघ तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 14 जुलै रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्याचे प्रारूप मतदारसंघ जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मतदान यंत्राची उपलब्धता
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात 3 हजार 597 कंट्रोल युनिट, 2 हजार 176 बॅलेट युनिट, 1 हजार 668 मेमरी चिप्स उपलब्ध आहेत. जिल्ह्यासाठी आणखी 478 कंट्रोल युनिट, 1 हजार 899 बॅलेट युनिटची गरज असल्याचे सांगण्यात आले. ही यंत्रे अन्य जिल्ह्यातून राज्य निवडणूक आयोग उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...