अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध कत्तल व्यवसायावर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने पाच ठिकाणी छापे टाकत 300 किलो गोमांस, 17 गोवंशीय जनावरे आणि इतर साहित्यासह एकूण 7 लााख 65 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकुण 15 संशयित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेक संशयित पसार झाले आहेत.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध कत्तलधंद्यांविरोधात तात्काळ कठोर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली विविध तपास पथक तयार करण्यात आली. हे पथक भिंगार कॅम्प, सोनई, लोणी, नेवासा व कर्जत या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रवाना करण्यात आले. रविवारी (8 जून) पंचासमक्ष छापे टाकून कारवाई करण्यात आली. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात इरफान इजाज कुरेशी (वय 35), तौफीक शफीक कुरेशी (वय 27), सरफराज रफिक शेख (वय 28), अबुझर खलील सय्यद (वय 23, सर्व रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून 45 हजार रूपये किमतीचे 150 किलो गोमांस जप्त केले आहे.
सोनई पोलीस ठाण्यात सलीम रौफ कुरेशी, साकीब जावेद कुरेशी, मुस्ताकीम कुरेशी (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. चांदा, ता. नेवासा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सर्व जण पसार झाले आहेत. पोलिसांनी 2 लाख 30 हजार रूपये किमतीचे 7 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. लोणी पोलीस ठाण्यात मुनीर कुरेशी, मुंतजीर कुरेशी, नियाज कुरेशी (पूर्ण नावे, पत्ता माहिती नाहीत) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 85 हजार रूपये किमतीच्या 4 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे.
नेवासा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोफियान बशीर सय्यद (रा. सलाबतपूर, ता. नेवासा), शाहीद गुलाम शेख व सलीम शेख (पूर्ण नाव माहिती नाही, दोघे रा. सलाबतपूर) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 45 हजार 400 रूपये किमतीचे 150 किलो गोमांस जप्त केले आहे. कर्जत पोलीस ठाण्यात शायबान आयुब कुरेशी (रा. राशीन, ता. कर्जत), समीर मुलाणी (पूर्ण नाव माहिती नाही, रा. राशीन, ता. कर्जत) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 लाख 60 हजार रूपये किमतीचे 6 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे.




