Saturday, November 16, 2024
Homeनगरजिल्ह्याला मिळाले तीन नवे तहसीलदार

जिल्ह्याला मिळाले तीन नवे तहसीलदार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारने राज्यसेवेत तहसीलदार म्हणून निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी तहसीलदारांना पदस्थापना देत नव्या पदावर नियुक्ती केली होती. जिल्हा प्रशासनात तीन नवीन तहसीलदारांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. निवडणूक शाखा तहसीलदारपदी आकाश दहाडदे, पुनर्वसन शाखा तहसीलदारपदी डॉ. हिमालय घोरपडे तर नगर अप्पर तहसीलदारपदाची सूत्र स्वप्निल ढवळे यांनी स्वीकारली.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे 2019 मध्ये तहसीलदार पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. कोरोना लाटे आल्याने निवड झालेल्या सर्व उमेदवारांना जानेवारी 2022 मध्ये प्रशिक्षणास प्रारंभ झाला. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर विविध जिल्ह्यांमध्ये परीविक्षाधीन तहसीलदार म्हणून प्रशासकीय कामकाजास प्रारंभ झाला. तो कालावधी नुकताच पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या महसूल व वन विभागामार्फत या सर्व प्रशिक्षणार्थी तहसीलदारांची पदस्थापना करीत त्यांना नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले होते.जिल्हा प्रशासनात तीन तहसीलदार आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखा तहसीलदार मनोज कुलथे यांच्या बदलीमुळे रिक्त असलेल्या जागेवर डॉ. हिमालय घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. घोरपडे हे एमबीबीएस असून एमपीएससीद्वारे त्यांची तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. जिल्हा निवडणूक शाखेतील तहसीलदार प्रदिप पाटिल हे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बदलून आले होते. त्यांच्या जागेवर आकाश दहाडदे यांची नियुक्ती झाली आहे. दहाडदे हे अभियंता पदवीधारक आहेत. एमपीएससीमार्फत मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारीपदी 2016 मध्ये निवड झाली. तीन वर्ष त्या पदावर काम केल्यानंतर एमपीएससी मार्फत तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात परीविक्षाधीन कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता जिल्हा निवडणूक शाखेत तहसीलदार म्हणून रुजू झाले. नगर तहसील कार्यालयातील कामाचा व्याप जास्त असल्याने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून नगर शहरातील नागरिकांसाठी अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. आता या नवनिर्मित नगर अप्पर तहसीलदार पदावर पहिल्यांदा नियुक्ती होण्याचा सन्मान स्वप्नील ढवळे यांना मिळाला आहे. तिन्ही तहसीलदारांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची भेट घेत आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या