Monday, January 26, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘नियोजन’ च्या 756 कोटी 43 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

Ahilyanagar : ‘नियोजन’ च्या 756 कोटी 43 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

शौर्य स्तंभासाठी 5 कोटींची तरतूद, पासपोर्ट कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी, जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे 5 लाखांचे अनुदान वाढवून 1 कोटी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 756 कोटी 43 लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत प्राप्त होणारा संपूर्ण निधी 100 टक्के खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करावेत. प्रशासकीय विभागांनी विकास प्रस्ताव तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी योग्य समन्वय ठेवावा, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला आ. किशोर दराडे, आ. सत्यजित तांबे, आ. आशुतोष काळे, आ. मोनिकाताई राजळे, आ. किरण लहामटे, आ. काशिनाथ दाते, आ. विठ्ठलराव लंघे, आ. अमोल खताळ, आ.विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

YouTube video player

बैठकीत 2025-26 या चालू आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. या वर्षासाठी जिल्ह्याकरिता 1 हजार 27 कोटी 31 लक्ष रुपये नियतव्यय मंजूर असून, त्यापैकी 801 कोटी 37 लक्ष रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त 569 कोटी 90 लक्ष निधीपैकी 228 कोटी 12 लाख रुपये कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आले आहेत. निधी व्यपगत होणार नाही, याची दक्षता घेऊन मंजूर आराखड्यानुसार 31 मार्चपूर्वी 100 टक्के प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी नियोजन विभागाला केल्या. चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेकडील विविध योजनांसाठी 254 कोटी 27 लाख रुपये तर नगरपालिका व नगरपंचायतींमधील योजनांसाठी 76 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठीची तरतूद 5 लाखांवरून 1 कोटी रुपये करण्यात आली आहे. या निधीतून प्रदर्शनासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर जिल्ह्यात अद्ययावत हायटेक सायन्स सेंटर उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाला देण्यात आल्या. वन विभागाच्या बळकटीकरणासाठी मंजूर 9 कोटी निधीतून नाईट व्हिजन दुर्बिणी, थर्मल ड्रोन्स व वाहनांची उपलब्धता झाली असून, बिबट्या रेस्क्यू सेंटरचा सविस्तर प्रस्ताव शासनास त्वरित सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. रस्ते विकासाचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी केवळ रस्त्यांची लांबी न वाढवता गुणवत्तेवर भर देण्याची सूचना केली. रस्त्यांचा दर्जा निकृष्ट आढळल्यास संबंधित कंत्राटदारांचे देयक थांबवून काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावी, तसेच रस्त्यांच्या कामासाठी पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर तांत्रिक निकषांचा वापर करावा, असे आदेश देण्यात आले.

भंडारदराच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा
नोव्हेंबर 2025 मध्ये 100 वर्षे पूर्ण होणार्‍या भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सवासाठी व तेथील ब्रिटीशकालीन विश्रामगृह व उद्यानाच्या नूतनीकरणासाठी पर्यटन विभागाकडे सादर केलेल्या 68 कोटींच्या प्रस्तावाचा मंत्रिमंडळ स्तरावर पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव व संगमनेर येथील भाविकांच्या सोयीसुविधांसाठी कुंभमेळा निधीतून तरतूद करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

..तर पोलिस अधिकार्‍यांचे निलंबन
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. संगमनेर, राहाता व प्रवरा लोणी परिसरात गुटखा, एमडी ड्रग्ज व अवैध कत्तलखाने सुरू असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, यापुढे अशा तक्रारी आल्यास संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

कोपरगाव क्षेत्रातील महामार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले. वीज बिल मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या. श्रीगोंदा येथील उपजिल्हा रुग्णालयाची इमारत पूर्ण असूनही पदनिर्मितीअभावी रखडलेले हस्तांतरण तातडीने पूर्ण करून तेथे बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील शाळा खोल्यांच्या कमतरतेबाबत शिक्षण विभागाने सर्वेक्षण करून सर्वकष आराखडा सादर करावा, अशी सूचना सदस्यांनी मांडली.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अकोले धुमाळवाडी येथील सोमेश्वर महादेव मंदिर देवस्थान, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बु. येथील विठोबा देव मंदिर देवस्थान व खळी येथील खंडोबा मंदिर देवस्थान, तसेच कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथील मारूती मंदिर देवस्थान ग्रामीण तीर्थक्षेत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. यासोबतच, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगणापूर येथे स्थलांतरीत करण्याच्या प्रस्तावासही या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस निरीक्षक शिळीमकर व उपायुक्त कराड यांना ‘राष्ट्रपती पदक’

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या...