Friday, September 20, 2024
Homeनगरकर्मचारी आकृतिबंध, मयत ठेव वाढविण्याचा विषय गाजला

कर्मचारी आकृतिबंध, मयत ठेव वाढविण्याचा विषय गाजला

विरोधकांसह सत्ताधारी गुरूमाऊलीकडून संगणक खरेदीच्या चौकशीची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बँक कर्मचार्‍यांचा आकृतिबंधचा विषय, विना परतावा मयत ठेव यासह बँकेच्या संगणक खरेदीचा विषय गाजला. यावेळी विरोधकांनी या विषयावर टीका केल्यानंतर गुरूमाऊली मंडळाने देखील या विषयावर बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांची कोेंडी करण्याचा प्रयत्न केला. तर संगणक खरेदीची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. शिक्षक बँकेची 105 सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. अध्यक्षस्थानी बाळासाहेब सरोेदे होते. सभेला शिक्षक नेते साहेबराव अनाप, प्रविण ठुबे, राजेंद्र शिंदे, बापूसाहेब तांबे, संजय शेळके, आबासाहेब जगताप, अर्जुन शिरसाठ, संजय धामणे, राजेंद्र निमसे, राजेंद्र विधाते, नवनाथ तोडमल, अविनाश निंभोरे, बाळासाहेब देंगडे, सुनील पवळे, सुनील शिंदे, बाबा आव्हाड, विद्युलता आढाव, आर. टी. साबळे, राजू राहणे, माणिक कदम यांच्यासह 15 शिक्षक संघटनांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळी 11 वाजता सुरू झालेली सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा सभा घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष रमेश गोरे, संचालक कैलास सरोक्ते, भाऊराव राहिंज, शिवाजी कराड, सरस्वती घुले, कारभारी बाबर, ज्ञानेश्वर शिरसाट, विठ्ठलराव महेंद्र भणभणे, सूर्यकांत काळे, शशिकांत जेजूरकर, योेगेश वाघमारे, संतोषकुमार राऊत, कल्याण लवांडे, गोरक्षनाथ विटनोर, अण्णासाहेब आभाळे, बाळासाहेब तापकीर, माणिक कदम यांच्यासह स्वीकृत संचालक विठ्ठलराव फुुंदे, दिशेन खोसे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, गणेश पाटील, संजय चौधरी आदी उपस्थित होते.

अध्यक्ष सरोदे यांनी सभेचे प्रास्ताविक केले. यात आरबीआयने बँकेवर दोनदा ताशेरे ओढल्याने कर्मचारी आकृतिबंध वाढविण्याचा निर्णय सभेसमोर घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर सभेत दत्तात्रय चोथे यांनी सभासदांच्या ठेवीवर जादा व्याज मिळावे, सहकार परिषदेवर झालेला खर्च वसूल करण्यात यावा. एकनाथ साठे यांनी मयत सभासदाचे कर्ज माफ व्हावे, जयप्रकाश साठे आणि नवनाथ अडसूळ यांनी शिक्षक बँकेने राष्ट्रीयीकृत बँकेनुसार डीडी काढण्याची व्यवस्था करावी. संतोष खामकर यांनी ही सभा आगळीवेगळी असून सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नाही. सभागृहात आल्यावर कोणाच्या बाजूला बसावे, असा प्रश्न होता. कर्मचारी आकृतिबंध वाढवू नये, त्याचा सभासदांना फटका बसणार आहे. व्याजदर कमी करावा, अशी मागणी केली. बाळासाहेब कोतकर यांनी संचालक मंडळाने खर्चावर नियंत्रण आणावे.

शिक्षकांना पगार चांगले असल्याने बँकेत काटकसरीने कारभार करावा. विनोद देशमुख यांनी बँकेतील एका केडरचा निधी दुसर्‍या निधीकडे वर्ग करू नयेत. आबा दळवी यांनी व्याजदर कमी करावा. विद्यमान संचालक मंडळ नशिबवान असून त्यांना कोणीच विरोध करत नाही. निवृत्ती भागवत यांनी संगमनेरच्या जागेच्या विषयावर चर्चा करत त्याठिकाणी नवीन जागा आणि इमारत कशी महत्त्वाची आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रविण ठुबे यांनी संचालक मंडळाने नवीन आकृतिबंधाचा विषय नामंजूर करावा. बँकेच्या खर्चात काहींनी त्यांचे दोन वर्षातील कार्यक्रमाचे खर्च टाकलेले आहेत. अहवालातील निवडणूक खर्चाचे कोडे आहे. स्वत:ची प्रतिमा तयार करण्यासाठी काहींनी सहकार परिषद घेत त्यावर दहा लाखांचा खर्च केला.

संगणक खरेदीत बड्या कंपनीचे संगणक दाखविण्यात येऊन असेंम्बली संगणक खरेदी करण्यात आले. प्राथमिक शिक्षक संघाचे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ठ असल्याने त्याचे खाते तात्पुरते बंद करण्यात यावे. ना परतावाऐवजी परतावा ठेवी सभासदांना मिळाल्या पाहिजेत. बबन गाडेकर यांनी संगमनेरच्या सध्या शाखेच्या जागेचे ऑडिट करण्यात यावे. त्यानंतर नवीन जागेचा विषय पूर्ण करण्यात यावा. राजेंद्र विधाते यांनी मात्र बँकेच्या आकृतीबंध वाढीस सहमती दर्शवत नवीन आकृतीबंध मंजूर न केल्यास आरबीआय त्यांचे माणसे बँकेत बसवतील. त्याचा बँकेला तोटा होणार, असे सांगितले. यावेळी बापू तांबे यांनी विरोधकांनी केलेेले आरोप खोडून काढले. यावेळी त्यांनी काही शिक्षक नेत्यांचे थेट नाव आपल्या भाषणात घेतल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी निंभोरे, ठुबे, चोथे त्यांच्या विरोधात तर गाडेकर त्यांच्या बाजूने होते.

दरम्यान सभेतून वॉकआऊट करणारे तांबे यांचा विद्युलता आढाव यांनी समाचार घेतला. एकछत्री कारभार करणारे दुसर्‍यांचे ऐकून घेत नाहीत. यामुळे विरोधक आमचे ऐकण्याआधी सभागृहातून निघून गेले. गुरूमाऊली मंडळातील फूट म्हणजे गुरूची विद्या गुरूला या शब्दांत टीका केली. दरम्यान, बँकेचा व्याजदर 0.50 पैशांनी कमी करण्याचा आदेश देऊन त्यावर अंमलबजावणी करून घेण्याऐवजी तांबे यांनी सभागृह का सोडले, असा सवाल किशोर माकोडे यांनी विचारला. तांबे गट निघून गेल्यावर सभा शांततेत पार पडली. बापूसाहेब तांबे यांनी सभेत भाषण करून त्यांच्यावर झालेले आरोप खोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भाषण संपल्यावर अहवाल सालातील चेअरमन चोपडे व मोटे यांच्यासह गटाच्या संचालकांसह सभेतून पळ काढला. त्यांनी व त्यांच्या गटाच्या संचालकांनी सभेत शेवटपर्यंत थांबायला हवे होते, अशी मागणी माजी चेअरमन साहेबराव अनाप यांनी यावेळी केली.

कर्जाची मर्यादा वाढली
सभेत सभासदांची कर्ज वाढविण्याची मागणी मान्य करून ती 3 लाखाने वाढवण्यात आली. तसेच सभासद पाल्यांच्या शैक्षणिक कर्जमध्ये 0.40% कपात केली. सभासदांना सात टक्के प्रमाणे लाभांश मंजूर करण्यात आला. तसेच कर्मचार्‍यांचा नवीन आकृतीबंध स्थगित करण्यात आला असून मयत कर्ज निवारण निधी वर्षातून दोनदा 750 रुपये प्रमाणे ना परतावा घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. जामखेड व संगमनेरची जागा घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, असल्याची माहिती अध्यक्ष सरोदे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या