अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पावसाने मराठवाड्यात धुमाकूळ घातला असलातरी नगर जिल्ह्यात काल रविवारी सायंकाळपर्यंत ढगाळ हवामान होते. त्यानंतर काही ठिकाणी रिपरिप तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस कोसळत होता. दोन तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर श्रीरामपुरात काल सायंकाळी रिमझीम सुरू झाली. रात्री 9 वाजेपर्यंत पावसाचा काहीसा जोर वाढला होता. हा पाऊस रात्री 12 वाजेपर्यंत सुरू होता. राहुरी तालुक्यातही रात्री काही ठिकाणी रिमझीम तर काही ठिकाणी रिपरिप सुरू होती. संगमनेर, कोपरगाव, राहाता, नगर, कर्जत, जामखेड, अकोले, पाथर्डी, पारनेरात कमी अधिक प्रमाणात रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता. नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुळा आणि प्रवरा नदीतील विसर्गही कमी झाला आहे.
जायकवाडीचा उपयुक्तसाठा 84.90 टक्क्यांवर
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता उपयुक्तसाठा 84.90 टक्के इतका झाला होता. या धरणात काल 16 हजार क्युसेक ने आवक नगर, नाशिक च्या धरणांमधून होत होती. जायकवाडीत यावर्षी लवकर भरण्याचे संकेत आहेत. काल या धरणात मृतसह एकूणसाठा 91.17 टीएमसी इतका झाला होता. या धरणाची क्षमता 102.72 टीएमसी इतकी आहे. 10 ते 11 टीएमसी पाण्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल. त्यातुन विसर्गही खाली सुरू होऊ शकतो. या धरणाचा उपयुक्तसाठा 76.65 टीएमसी इतका आहे. काल या धरणात उपयुक्तसाठा 65.10 टीएमसी इतका झाला होता.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग काल सायंकाळी 3155 क्युसेकवर आला होता. दोन दिवसांपासून या धरणाच्या पाणलोटात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे नवीन पाण्याची आवक थांबल्याने विसर्ग कमी झाले आहेत. तरी काही धरणातील विसर्ग बंद करण्यात आले आहेत. काल दारणातून 2071 क्युसेक, भावलीतून 135 क्युसेक, भाम मधुन 820 क्युसेक, वालदेवीतून 183 क्युसेक, आळंदी 87 क्युसेक, पालखेड 828 क्युसेक, करंजवण 602 क्युसेक, वाघाड 437 क्युसेक, तिसगाव 118 क्युसेक, पुणेगाव 150 क्युसेक, ओझरखेड 228 क्युसेक असे विसर्ग सुरु आहेत. काल गोदावरी नदीतून जायकवाडीच्या दिशेने नांदूरमधमेश्वर बंधार्यातून 39.7 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.