डॉ. अर्चना तोंडे
भर मे महिना, उन्हाचा लाव्हा उसळतोय, माणसं गर्मीनं बेजार झालेत. पण हा त्रास अगदी नगण्य वाटावा असा करोनाचा त्रास बाहेर चालू आहे.
ऐन सुट्टीत मुलं बाळ घरात कोंबून ठेवावी लागत आहेत.
दाराबाहेरच्या हवेचीही दहशत बसावी अशा भयानक मृत्यूचं थैमान सुरू आहे.
अचानकच सारं ठप्प झालय. काम धंदे बाजार सगळं बंद.
त्याचं तर जगणंच मुश्कील झालंय. भुकेले, तहानलेले अडकून पडलेत.
पण काही झालेत जीवावर उदार. सगळी वाहतूक बंद असूनही केवळ पाय शाबूत आहेत म्हणून निघालेत ते चालत हजारो किलोमीटर दूर असलेल्या घरी पोचण्यासाठी उन्हातान्हात दोन बोचकी पाठीवर व कमरेवर पोरं घेऊन. ज्यांची शक्तीच कमी आहेत ते उन्हाचे बळी जाताहेत. कोणी थकून रुळावरच झोपलेत. रेल्वे बंद आहे या भ्रमात. पण एक मालगाडी येते हा भ्रम तोडत त्यांना सरळ तुकडे करून निघून जाते. एखाद्या रिमोट तुटलेल्या रोबो राक्षसाप्रमाणे. टी.व्ही. बंद असला तरी फोन वरून येतच आहे सगळं कानावर.
जीव नुसता कासावीस होतोय. काय करता येईल. कसं करता येईल. काहीच सुचत नाहीय. पण संसर्गाची भीती इतकी जबरदस्त की बाहेर पडण्याची हिंमतच नाही.
स्वत:चाच राग येतोय. स्वत:च्याच हतबलतेचा, अगतिकतेचा वीट आलाय. श्वास घेणं सुद्धा अपराध वाटतोय.
जेणं तर नकोसंच झालंय.
अशा मनस्थितीत एक दिवस रात्री सारे झोपण्याच्या तयारीत असतांना मैत्रिणीचा फोन येतो व दीड तासात मेधाताई नाशकता पोचताहेत. पुढचे चार दिवस त्या तुझ्याच घरी राहतील. तेव्हा तुला काय पंचकर्म करायचं ते करून टाक.
ती मेधाताई पाटकरांबद्दल बोलतेय हे समजायला काही सेकंद गेली.
मी पटकन् ताईच्या चालकाला फोन करून पत्ता समजावून सांगितला. त्या सकाळीच धुळ्याहून निघाल्या होत्या. परंतु रस्त्यात जिथे जिथे रस्त्यावरून लोक पायी जातांना दिसत तिथे थांबून त्या त्यांची वाहनाची व्यवस्था करूनच पुढे जात. म्हणून त्यांना नाशकात पोचायला रात्रीचे 12 वाजले.
अंधारात त्यांना कळतच नाही आम्ही कोण आहोत. ते. त्या उतरता उतरताच म्हणाल्या कुणाकडे आलेय मी आम्हीपण जरा गु आवाजातच सांगितलं. डॉ. तोंडेकडे इतक्या ताणातही त्यांनी आमच्या गमतीला हसून दाद दिली व क्षणात त्या त्रास विसरल्या.
एवढ्या रात्री आधी स्नान करून त्यांनी लगेच मागच्या कामाचा आढावा घेतला. त्यांची मंडळी पोचलीच होती तोपर्यंत मग दुसर्या दिवशीच सारं नियोजन अनिताताईंना सांगूनच त्या जेवायला बसल्या व रात्री 2 वाजता तेलाचा बस्ती दिला व हात धुवून येते तोपर्यंत त्या गाढ झोपी गेल्या.
सकाळी पाचलाच त्या उठून लिहिताहेत एकीकडे फोनवर ही बोलणं सुरूच. जणू काल दिवसभर त्यांनी प्रवास केलाय हे खोट वाटावं.
त्या क्षणी ठरवलं. त्यांना काहीही डिस्टर्ब करायचं नाही. एरवी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी धडपडणारी मी पण सरळ केवळ यजमानाच्या भूमिकेत शिरले. त्यांच इथलं वास्तव्य विनाव्यत्यय व आरामदायी असावं यासाठी प्रयत्न करायचे.त्यांच्या सहवासाचा शांतपणे आनंद घ्यायचा हा आनंद फारच दिव्य होता. सकाळी-सकाळीच अनिताताई, मुक्ता सारीच मंडळी गोळा झाली.
सुरक्षा पोलीस, अधिकारी सारेच ताईंना भेटायला त्यांची सुरक्षितता बघायला येऊन गेले. दिवसभर नुसता धावपळीचा. चहा, नाश्ता सार्यांची जेवणं नुसती धुम. एखादा समारंभच जणू. पण संसर्गाच्या भितीने घरातल्या मदतीनिसांना सुट्टीवर पाठविलेलं. सासूबाई व मुलांना जर बाजूला राहायला सांगितलेलं. मी व नवरोबाने सहजच सारं पार पाडलं. इथे मनोहरदादा मात्र दररोज एक पदार्थ आणून जेवणाची लज्जत तर वाढवित होतेच. पण मला मदतही होत होती.
हा सारा समारंभ तीन दिवस चालला. तीन दिवसात एक व्यक्ती काय काय मोठी मोठी काम करू शकते. हे अगदी जवळून बघायला मिळालं. ताई सकाळीच निघून जिल्हाधिकारी, रेल्वे अधिकारी, बस अधिकारी सार्यांना भेटत होत्या. ट्रेन, बस यांची योजना करत होत्या. अगदी कोणती ट्रेन कोणत्या मार्गाने पाठवावी याचा विस्थापितांच्या संख्येवरून अभ्यास करून अधिकार्यांना सूचना देत होत्या. तस घडत नसेल तर पुन्हा पुन्हा पाठपुरावा करत होत्या.
अगदी रात्री इगतपुरीला काही मजून दिसेल तर त्यांना नाशकात आणलं त्यांची खाण्याची, झोपण्याची व्यवस्था केली. कारण नाशिकवरून सकाळी त्यांच्या गावाला जाणारी ट्रेन सुटणार होती. दुसर्या दिवशी अगदी सातलाच त्यांनी चालकाला ते मजून ट्रेनच्या वेळेपर्यंत रेल्वेस्टेशनपर्यंत पोचतात की नाही हे पाहण्यासाठी पिटाळलं. त्यांची काही बातमी मिळेपर्यंत त्यांना चैन पडेना. शेवटी कल्याणी (अनिताताईंची मुलगी) दुपारी बाराला घामाघूम होऊन आली व सगळी व्यवस्था झालीय हे सांगितलं. तेव्हाच त्या स्वस्थ झाल्या.
वंचिताप्रतीची ही जी तळमळ आहे ती अगदी ते सारे त्यांचे आप्तस्वकिय वाटावेत अशीच होती. त्यांच्या ठिकाणी आता आपपर भाव मुळी नाहीच आहे. सगळेच त्यांचे आहेत व त्या सगळ्यांच्या आहेत. याच व्यक्तीमत्वाला साधू म्हणत असावेत खचित.
ही साध्वी माझ्या घरी आली. जणू सहा महिने आधीच भर मे मध्ये विचारांची, चांगुलपणाची, प्रेमाची, येण्याची दिवाळी साजरी करून गेली.
दिवाळी ही सुख-समृद्धी आणते किंवा देऊन जाते.
साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा. यातली दिवाळी ही आमच्यासाठी उदात्ततेची, मांगल्याची जाण देऊन गेली.
माझ्याच माझ्या कोपातून मला बाहेर काढून गेली.
मी व्यवसायाने डॉक्टर आहे. हा व्यवसायच मुळी सेवेचा असा एक आम्हा सर्वांचा समज. त्यातून कमी मूल्य घेणं म्हणजे चांगला डॉक्टर त्यातून गरजूंना पूर्ण विनामूल्य चिकित्सा देणं. त्यातूनही फार झालं तर ज्याच्याकडे पैसेच नाहीत त्याची राहण्याखाण्याची व्यवस्था करणं जाण्यायेण्याची व्यवस्था करणं हे म्हणजेच आमचं चांगूलपण. परंतु चांगलेपणाची एक व्यापक व्याख्या ताईंनी त्यांच्या आचरणातून शिकविली आहे. जी शिकवण आयुष्यभराची पुंजी आहे. जीवन आणखी समृद्ध करणारी.
सहा महिन्यापूर्वी माझ्या घरी साजरी झालेली ताईंच्या कार्याची दिवाळी. आजच्या लौकीक दिवाळीपेक्षा कितीतरी आनंददायी होती असं मला वाटतंय.
नाशिक
7588306951




