Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedमन करा रे प्रसन्न... : संत राजिंदर सिंह जी महाराज

मन करा रे प्रसन्न… : संत राजिंदर सिंह जी महाराज

दिवाळी हा सणच मुळात सकारात्मक संदेश देत असतो. मनातील, जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी सकारात्मक विचार करा. मनाला प्रसन्न करा. त्यासाठी हे मन शांत असणे आवश्यक आहे. आणि मग मन:शांतीसाठी सद्गुरुंना शरण जा. त्यांच्या सानिध्यात जीवनाचे सार समजावून घ्या. मनातील षड्रिपूंवर विजय मिळवा. तरच आपले जीवन सदोदित प्रकाशमान राहू शकते. दिवाळी खर्‍या अर्थाने मनामनात साजरी होऊ शकते…घराच्या स्वच्छतेबरोबरच मनाची स्वच्छता याचसाठी करा…

संत तुकाराम सांगूनच गेले आहेत… मन करा रे प्रसन्न…सर्व सिद्धीचे कारण…यंदाच्या दिवाळीत आपल्याला हेच करायचे आहे. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. इतिहासात डोकावले की लक्षात येते, आजच्या दिवशी मोठमोठ्या संत-महात्म्यांच्या जीवनात अनेक घटना घडल्या. दिवाळीच्या काही दिवस अगोदर आपण आपल्या घरांची साफ-सफाई करतो.

- Advertisement -

आपल्या घराची साफ-सफाई करताना आपण त्या वस्तूंना बाहेर काढतो ज्या आपल्याकरिता उपयुक्त नसतात. जर आपण आपल्या बरोबर बरेचसे अनावश्यक सामान बाळगत असू अथवा त्या वस्तूंकडे लक्ष देण्यात आपला वेळ वाया घालवत असू, ज्या आपणांस काही लाभ मिळवून देत नाही, तर याचा अर्थ असा आहे की, आपण असे जीवन जगत आहोत ज्यामध्ये आपले लक्ष जीवनाच्या उद्देशाप्रती नाही. अशा अवस्थेत आपल्या अंतरी सदैव एक संघर्ष चालू असतो, ज्यामध्ये एकीकडे आपले मन या बाह्य संसारात लिप्त राहू इच्छिते तर दुसरीकडे आपला आत्मा अंतरात परमात्म्याला प्राप्त करू इच्छितो. आपला आत्मा मनाद्वारे उत्पन्न झालेल्या मलिनतेला साफ करण्याचा प्रयत्न करत असतो. आपले मन काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकाराच्या या 5 चोरांच्या मदतीने आपल्या अंतरी मलिनता, अंधकार निर्माण करते.

आपण स्वतःला तोपर्यंत शांत करू शकत नाही, जोपर्यंत आपणांस एका चांगल्या गुरुची, सद्गुरुंची मदत मिळत नाही. एक परिपूर्ण सद्गुरु आपली मदत कशी करतात? तर सर्वप्रथम ते आपणांस पवित्र नामाशी जोडतात. जेव्हा आपण ध्यानाभ्यासादरम्यान आपल्या सद्गुरुंनी दिलेल्या नामाचे स्मरण करतो, त्यामुळे आपले मन शांत होते. ज्यामुळे आपण आपल्या अंतरिच प्रभूच्या ज्योती व श्रुती आपण अनुभवतो. दुसरे असे की, सद्गुरु आपणांस हे ही समजवितात की, निष्काम सेवा केली तरच आपण मनाच्या दुष्प्रभावांपासून मुक्ती मिळवू शकतो आणि मनावर नियंत्रण ठेवू शकतो. यामुळे आपला आत्मा सुद्धा शुद्ध होतो. आपल्या सद्गुरुंच्या मार्गदर्शनातच आपण आपले जीवन योग्य दिशेने मार्गक्रमण करु शकतो. आणि खर्‍या अर्थाने दिवाळीचा सण साजरा करू शकतो.

सर्व धर्मांच्या मुलभूत शिकवणूकीत आपणास हेच सार सांगण्यात आले आहे की, जशी आपण बाहेर दिवाळी साजरी करतो, अगदी त्याप्रमाणे आपण आपल्या अंतरीसुद्धा, अंतर्मनात देखील दिवाळी साजरी करू शकतो. दिवाळीच्या सणात आपण जे दिवे प्रज्वलित करतो आणि फटाके फोडतो ते सर्व आपल्या अंतरी विद्यमान प्रभूच्या ज्योती व श्रुतीचे प्रतीक आहे.

चला तर मग, दिवाळीच्या या सणाला आपण सुद्धा बाह्य सफाईबरोबरच आपली आंतरिक सफाई करु. आणि सर्वात महत्त्वाचे की आपण ध्यानाभ्यासास वेळ देऊ या. जेणेकरून आपणास प्रभूच्या ज्योती आणि श्रुतिचा अनुभव मिळेल आणि आपले जीवन खर्‍या ैअर्थाने प्रकाशमान होईल.

– संत राजिन्दर सिंहजी महाराज

- Advertisment -

ताज्या बातम्या