आदिवासीबहुल नाशिक जिल्हा विविध पिकांच्या बाबतीत समृद्ध आहे. विविध तालुक्यांमधील भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान आणि स्थानिक सुविधांसह शासनाच्या योजना आणि बाजारपेठ या सर्वांच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील पिके, त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आढळतात. या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत येथील बळीराजाही जिल्ह्याच्या समृद्धीसाठी कायम संघर्ष करत असतो. आस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत जिल्ह्यातील शेतकर्यांनी काळानुरूप पीक पद्धतींमधील बदलही तितक्याच सकारात्मकतेने स्वीकारलेले दिसून येतात.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा विविध पीक पद्धती व पिकांनी नटलेला आहे. जसे जिल्ह्यातील पूर्व भागातील येवला, नांदगाव, मालेगाव तालुक्यात बागायत भागात शेडनेटमधील संरक्षित शेती. त्यात विविध भाजीपाल्यांची पिके करतात. काही शेतकरी कांदा, ऊस, मका, बाजरी, ज्वारी करतात. तर निफाड, सिन्नर, दिंडोरी (पूर्व) भागात ऊस, द्राक्ष, कांंदा, मका, बाजरी करतात. फळांंमध्ये कमी पावसाच्या तालुक्यांमध्ये डळिंब, द्राक्ष पिके घेतात.
परंतु नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेकडील सह्याद्रीच्या डोंगर रांगांतील सुरगाणा, पेठ, त्र्यंबक, इगतपुरी, दिंडोरी (पश्चिम भाग) या भागात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने खरिपात प्रामुख्याने भात, नागली, वरई, कुळीथ, उडीद, तूर, खुरासणी, भुईमूग ही पिके घेतली जातात. त्यातल्या त्यात सपाटी व भात खाचराच्या जागेत प्रामुख्याने 70 टक्के प्रमाणात भात हेच जास्त पावसात येणारे पीक घेतले जाते. डोंगर उतार जागेवर नागली, वरई, कुळीथ, उडीद, तूर ही पिके घेतली जातात.
पेठ, सुरगाणा, त्र्यंंबकमध्ये ज्या ठिकाणी लघुपाटबंधारे, विहिरी, पाट, नद्या, सिंचनाची व्यवस्था आहे तेथे 10 ते 15 टक्के भागात ऊस, कांदा, गहू, हरभरा, भुईमूग ही पिके घेतली जातात. सिंचनाच्या जागेत भाजीपाला पिकात दुधी भोपळा तिन्ही सिझनमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. (नाशिक मार्केटमध्ये येणारा 70 ते 75 टक्के दुधी भोपळा पेठ, दिंडोरी (प), हरसूल परिसरातून येतो)
भात – आदिवासी तालुक्यातील पीक पद्धतीमध्ये येथील भात हेच मुख्य पीक आज खरिपात घेतात. त्यात प्रामुख्याने इंंद्रायणी, दप्तरी, कोळंबी, सह्याद्री एक काडी, आर-24 या जातीच्या भाताची लागवड केली जाते. लागवड पद्धतीत प्रामुख्याने दोरीवर लावली जाणारी चारसूत्री पद्धत, पारंंपरिक पद्धत व गेल्या दोन-तीन वर्षांपासून काही शेतकरी एसआरटी पद्धतीने (सगुणा राईस तंत्र) भात शेती करत आहेत.
नागली/वरई – सध्या आदिवासी भागात कृषी विभाग व शासनाच्या योजनांमधून जमीन सपाटीकरणाची कामे झालेली असल्याने जे नागली/वरई पिकाचे क्षेत्र होते ते भात पिकाखाली आले. त्यामुळे नागली/वरई क्षेत्र फार थोडे म्हणजे अवघे 20 ते 25 टक्के राहिले आहे. जेथे डोंगर उतार जागा आहे, फॉरेस्ट प्लॉट आहेत तेथेच नागली-वरईचे पीक मर्यादित स्वरुपात पारंपरिक लागवड पद्धतीने म्हणजे राब भाजणी, नांगरट व लागवड (लावणी) केली जाते.
आंबा – आदिवासी भागातील शेतकर्यांंचा कल सध्या आंंबा फळ पिकाकडे वाढला आहे. त्याचे कारण पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यात केशर आंब्याची एक वेगळी अतिचविष्ट जात असल्याने व गुजरात, महाराष्ट्रभर त्याची मागणी असल्याने आंंबा (केशर) बागांमध्ये शेतकर्यांंनी स्वत: कृषी विभागाच्या योजनांतून लागवड केली आहे. काही शेतकर्यांनी नवीन तंंत्राने एक एकर क्षेत्रात 500 ते 600 झाडे, अशी धान लागवड केली आहे व त्याचे उत्पन्नही चांंगले व हमखास मिळत असल्याने आंबा पिकाखालील क्षेत्र वाढत आहे.
तुती लागवड/ सेंद्रीय शेती आदिवासी तालुक्यातील काही थोड्याफार प्रगतिशील शेतकर्यांनी रेशीम शेतीसाठी तुती लागवड केली आहे व त्यांचे रेशीम कोष उत्पादनही काही शेतकरी तीन-चार वर्षांपासून घेत आहेत.
रेशीम शेतीसाठी खास सेंद्रीय विकास खाते व जिल्हा परिषदेची महात्मा गांधी स्वयंरोजगार योजना लागू असल्याने तसेच लागवडीसाठी, शेडसाठी व साहित्य खरेदीसाठी अनुदान उपलब्ध असल्याने काही शेतकरी तुती लागवड करून रेशीम शेतीकडे, ज्यांंना बारमाही पाणी उपलब्ध आहे असे शेतकरी वळत आहेत.
काही अंंशांनी आदिवासी भागातील पीक पद्धती व पिके बदलत आहेत. यासाठी अजून शासन व कृषी विभागाचे मार्गदर्शन व आर्थिक सहकार्याची येथील शेतकर्यांत खर्या अर्थाने गरज आहे.
यशवंत महादू गावंडे, लेखक