बागलाण म्हणजे सह्याद्रीची सुरुवात! साल्हेर-मुल्हेर पर्वतरांगांपासून नीलगिरी पर्वतापर्यंत पसरलेल्या सह्याद्रीचा अग्रभाग म्हणजे बागलाण. बागलाणमध्ये डोंगरांची नावे लक्षात ठेवण्यासाठी काही पौराणिक कथा ऐकावयास मिळतात. त्यावरून या प्रदेशातील इतिहास आणि पुराणातील दाखलेही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हा पारंपरिक वारसा एका पिढीकडून दुसर्या पिढीपर्यंत आपण पोहचवला पाहिजे…
बागलाण म्हणजे सह्याद्रीची सुरुवात! सह्याद्रीचे उत्तर टोक, साल्हेर-मुल्हेर पर्वतरांगांपासून नीलगिरी पर्वतापर्यंत सह्याद्री पसरलेला आहे. त्याचा अग्रभाग म्हणजे बागलाण. महाराष्ट्रातील सर्वात उंंच पठार म्हणजे बागलाण. अशा या बागलाणमध्ये डोंगरांची नावे लक्षात ठेवण्यासाठी काही कथा आहेत. त्यातील एक कथा म्हणजे साल्हेरचे स्वयंवर. स्थानिक आख्यायिकेनुसार साल्हेर ही मुलगी आहे, तिच्या स्वयंवरात 52 डोंगर सहभागी झाले होते. अहंकारी टकार पर्वत हा अतिउत्साहात त्याच्यासोबत लग्नाचे वर्हाड, बँड-बाजे घेऊन आला होता. पण स्वयंवराच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे चिडून तो साल्हेरला ओढून नेत होता. त्यावेळी साल्हेरच्या मदतीला तिचे तिन्ही भाऊ धावून गेले. त्यापैकी एक साल्होटा याने तिचा हात धरून ठेवला व नाखिंदा व कोठ्या डोंगर साल्हेर समोर येऊन थांबले.
अजूनही टकार पर्वत जेथून आला त्या खालील गावांची नाते- सोयरीक साल्हेर गावाशी जमत नाही. त्या लग्नात कोठ्या डोंगराकडे जेवण वाढायचे काम होते. त्यामुळे त्याच्या जवळील चार छोट्या टेकडींना वाढपी म्हणतात. कोठ्या म्हणजेच अन्न-धान्याचे कोठार. नाखिंदा डोंगराकडे पाण्याची व्यवस्था होती. आजही साल्हेर पंंचक्रोशीत दुष्काळावेळी कुठे पाणी नसले, तरी नाखिंदा डोंगराकडे पाणी भेटते. टकार पर्वताशेजारील तिन्ही डोंगरांना कलोरी असे संबोधले जाते. बँड-बाजे यावरून तेथील एका डोंगराला नगारा- वायदूण्या म्हटले जाते. आजही तेथे हवेचा नाद नगारा वाजवल्यासारखा येतो. ज्या घाटातून आपण साल्हेरला जातो, त्याला लग्नाची बारी म्हटले जाते.
लग्नात बारा जातीच्या लोकांचे काम असते, म्हणून साल्हेर समोरील डोंगराला माळी जातीवरून माळपुंज याप्रमाणे बामण, सोनार्या, लोहारा, कुणब्या, सुतारा, साबरपेढ्या, वाण्या, मांग्या, तेल्या-तांबोळ्या, न्हावी अशी डोंगरांची नावे आढळतात. साल्हेरजवळील एका पठाराला अखोत्याचे पठार म्हणतात. अखोत्या म्हणजे अक्षदा. ते ही पुन्हा लग्नाच्याच संबंंधी आले. पुढे एक कथा अशी येते की विचित्रवीर्याचा वध करण्यासाठी परशुराम महाराजांनी युद्ध आरंभिले.
त्या युद्धात अन्यायी, अधर्मी राजे विचित्रवीर्याच्या बाजूने लढले व धार्मिक राजे परशुराम महाराजांकडून लढले. ते युद्ध सलग 21 दिवस चालले. यात अन्यायी, मुजोर क्षत्रिय मारले गेले. एक चांगले सुशासन म्हणून परशुरामांनी अश्वमेध यज्ञ केला. त्या यज्ञाचे यजमान पद वशिष्ठांकडे दिले. पण वशिष्ठांनी यजमानपदाच्या बदल्यात परशुरामांनी केलेल्या प्रचंड नरसंहाराबद्दल त्यांना प्रायश्चित्त म्हणून पुन्हा नव्या कुमारी भूमीवर जाऊन 21 वर्षे तपश्चर्या करण्यास सांगितले. ती दुसरी कुमारी भूमी म्हणजेच बागलाण तालुक्यातील साल्हेर. तेथून त्यांनी स्वत:साठी अपरांत भूमी निर्माण करून इतर भूमी सप्तर्षीना दान केली. हा भाग म्हणजे साल्हेर ते मुल्हेर किल्ल्यांमधील सप्तऋषींचे डोंगर आहे.
काही ठिकाणी या डोंगररांगेला ‘पाच पांडव’ असेही संबोधतात. येथील प्रत्येकी एकेक डोंगराला ऋषींचे नांव आहे. साल्हेर समोरच सात शिखरांची एक शृंखला आहे. त्या सातही पर्वतांना गवळणी म्हटले जाते. पूर्वी एक परिक्रमा होती. सात गवळणी आणि आठवा परशुराम. आदिवासी बांधव डोंगरदेव उत्सवावेळी ती परिक्रमा करीत असत. ह्या सातही गवळणीवर देवींची स्थाने आहेत. साल्हेरपासून 15 किमी अंतरावर गुजरात राज्यात डोन नावाचे गाव आहे. त्या गावाजवळ मोठा डोंगरकडा आहे. त्या ठिकाणी डोंगर कड्याला 100 ते 150 गुहा कोरलेल्या आहेत. त्या गुहांचे वर्णन रामायणकालीन वाली आणि सुग्रीव यांची ‘किष्किंधा नगरी’ असे केले जाते. तेथे अंजनी डोंगरही आहे. पूर्वीचे हे दंडकारण्य होते व याच दंडकारण्यावरून या भागाला डांग असे म्हटले जाते.
या ठिकाणी आजही हजारोच्या संख्येत वानरे आहेत. येथे नल-नील मंदिर आहे. हनुमानाचा जन्म झाला, त्यावेळी त्यांंनी सूर्य पकडण्याकरिता आकाशात झेप घेतली. तेव्हा इंद्रदेवाने हनुमानाला वज्राचा प्रहार करून पाडले. हनुमान ज्या ठिकाणी खाली कोसळले ती जागा टकार पर्वता मागे आहे. तेथे नकट्या हणवत नावाचे गाव असून बाल मारुतीची पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. टकार पर्वताबाबत आणखी एक कथा सांगितली जाते की लंकेत लक्ष्मण मूर्च्छित पडलेला असताना हनुमंतांना संजीवनी वनस्पती आणण्यास पाठवले होते. पण सूर्य उगण्याच्या आत येणे गरजेचे होते. या टकार पर्वतावर भरत बसले होते. त्यामुळे मारूती द्रोणगिरी उचलून घेऊन येत असताना त्या संजीवनी वनस्पतींचा प्रकाश पडत होता.
यात भरताने सूर्य उगवला म्हणून त्या दिशेने बाण मारला, तो बाण हनुमंताच्या पायाला लागल्यामुळे ते टकार पर्वताच्या खाली उलटे पडले. तिथे हनुमंताची 40 फूट उलटी मूर्ती डोंगराच्या दरीत आहे. त्यास उबड्या हणवत असे म्हणतात.
पांडव अज्ञातवासात असताना डांग-खांडववन भागात वास्तव्यास होते. खांडववन म्हणजे आजचा खानदेश. त्यामुळे बागलाण-डांग प्रांतातील अनेक गावांची नावे पांडवांशी निगडीत आहेत. जशी, पांडवगड, पांडवा, पांडरून, भीमखेत, अर्जुनगड, नैकुले अशी काही… त्यात डेरमाळ गडाजवळील अनेक मंदिर व गुहांना भीमाशी निगडित नावे आहेत. अशीच एक आख्यायिका हिंदळबारीविषयी ऐकायला मिळते.
अज्ञातवासात असताना भीम आणि हिडिम्बाची येथे भेट झाली. हिडिम्बा देवीचे मंदिर आजही ‘हिंदळबारी’त आहे. तिच्या नावावरूनच त्या घाटाला हे नाव पडले. तसेच घाटाच्या खाली भीम व हिडिम्बा यांच्या मुलाचे म्हणजे ‘घटोत्कच’चे मंदिर आहे. बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगी-तुंगी पर्वताशी संबंधित आणखी एक कथा वाचण्यास मिळते.
जेव्हा श्रीकृष्णाच्या यादव कुळाचा नाश झाला, तेव्हा ते फिरत मांगी-तुंगी पर्वतावर आले. एका झाडाला पाठ लावून बसले, त्यांचे गोरे चरण सूर्य मावळते वेळी सुवर्ण रंगात चमकत होते. तेथेच जंगलात असलेल्या पारध्याला ते हरीण वाटले. त्याने त्या दिशेने बाण मारला. तो श्रीकृष्णाच्या पायाला लागला. वेदनेने ते विव्हळायला लागले. त्यातच त्यांचा प्राण गेला.
पुढे बलराम त्यांचा शोध घेत या पर्वतावर पोहोचला. अचेतन श्रीकृष्णाला पाहून बलराम अतिशय शोकाकुल झाला, बलरामाची समजूत काढण्यासाठी राजवैद्यांनी सांगितले की, शेजारील वाळूच्या डोंगरातून तू तेल काढ व श्रीकृष्णाच्या पायाला झालेल्या जखमेवर लाव. त्यामुळे श्रीकृष्ण जिवंत होऊ शकतील. लगेच बलरामाने पाताळेश्वर येथून सर्प आणून शेजारील घाण्या पर्वताला बांधून तेल काढण्यास सुरूवात केली.
अखंड प्रयत्न करून घाण्या पर्वतातून तेल बाहेर यायला सुरूवात झाली. पण तोपर्यंत खूप वेळ निघून गेला होता. शेवटी हताश होऊन इंद्राच्या सांगण्यावरून बलरामाने श्रीकृष्णाची अंत्येष्टी मांगी-तुंगी पर्वतावरील पठारावर केली. ही कथा इतर कृष्णकथांपेक्षा वेगळी असल्याचे जाणवते. आता या कथेची सत्यता जाणून घेऊ. मांगी-तुंगी पर्वताशेजारील गडाला ‘घाण्या गड’ असे म्हटले जाते. त्याच्या मध्यभागी गोलाकार काहीतरी घासल्याचे स्पष्ट जाणवते, या घाण्या गडाखालील वस्तीस ‘तेलीवाडी’ म्हणतात बागुल राजवटीत सर्व प्रकारचे तेल तुंगण व तेलीवाडीतून मुल्हेर बाजारपेठेत येई.
मांगी-तुंगीपासून दोन किमीवर ‘न्हावीगड‘ नावाचा किल्ला आहे. पूर्वी त्याला ‘नागांचल असे म्हणायचे व त्याच्या पायथ्याशी असणार्या गावाला ‘पाताळवाडी’ म्हणतात. मग हेच ते ‘पाताळेश्वर’ असू शकते. अजूनही या पाताळवाडी परिसरातील जंगलात 12 फुटी प्रकारातील नाग व साप आढळतात. खूप मोठे नाग दिसल्याचे येथील स्थानिक नेहमी सांगतात. या ऐकीव गोष्टींवरून तरी श्रीकृष्ण कथा खरी असल्याचे वाटते.
एकाच डोंगराचे अलीकडे-पलीकडे नावे आणि कथा वेगवेगळ्या आहेत. इतिहास लक्षात ठेवण्यासाठी पूर्वजांनी त्यांच्या कथा बनवल्या आहेत. ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या डोंगरांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी ह्या कथा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे लोक उत्सव, परंपरेच्या माध्यमातून सोपवल्या जातात आणि हा सांस्कृतिक वारसा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे.
महादेव डोंगररांग सातारा जिल्ह्यातून सुरू होते. या रांंगेने कृष्णेचे खोरे वेगळे केले आहे. गाळाचे खडक आणि लॅटराईट या पठाराचा खडक प्रकार आहे. त्यानुसार मोठे वृक्ष आणि पानगळीची वने निर्माण झाली आहेत. महाबळेश्वर हे या रांगेतील उंच आणि थंड हवेचे ठिकाण, महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनलं आहे.
या तीन डोंगररांगांच्या दरम्यान साधारणपणे लाव्हा उद्रेकाच्या दरम्यान तयार झालेला बेसाल्ट खडक आहे. इथे आढळणारी काळी मृदा मध्य सह्याद्रीतील रेगूर मृदेपेक्षा वेगळी आहे. शिवाय कमी उतार आणि बेसाल्ट खडक असल्यामुळे नद्यांच्या मार्गात स्तंभीय खणन कमी होते. म्हणून या नदी प्रणालीत गाळाचे वहनही कमी होते.
मध्य सह्याद्री मुख्यत्वे ग्रेनाईट आणि पट्टीताश्म प्रकारच्या खडकाने बनला आहे. प्रिकॅम्ब्रियन काळातील ज्वालामुखी उद्रेकाने हा भूभाग तयार झाला आहे. युरेशियन भूखंंडाकडे जात असताना झालेल्या पुनर्बांधणीत हा भाग उत्तर सह्याद्रीच्या तुलनेने कमी बाधित झाला. मुख्यत्वे कर्नाटक पठाराच्या या भागात बाबाबुदान ही सह्याद्रीची उपरांंग आहे. ही उपरांंग लोह खनिजाच्या दृष्टीने समृद्ध आहे. कर्नाटकच्या उपपठाराचा भाग म्हणजे म्हैसूर पठार. हे पठार बाबाबुदान पर्वतरांगांचाच भाग आहे. यातील कोलार प्रदेशात सोने सापडते. याशिवाय मँगनीज, क्रोमियम, बॉक्साईट आणि तांबे ही महत्त्वाची खनिजे या प्रदेशात आढळतात. पट्टीताश्म हा रूपांतरीत खडक प्रकार आहे. हा क्वार्टझ आणि फेल्सपारचा महत्वाचा स्रोत आहे.
कुद्रेमुख (1892 मी.) पुष्पगिरी (4714 मी.) आणि वावूलमाला (2339 मी.) ही मध्य सह्याद्रीतील उंंच शिखरे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू मध्य सह्याद्रीच्या दक्षिण टोकाला एकत्र येतात. ही पर्वतरांग निलगिरी पर्वतरांग म्हणून ओळखली जाते. या रांंगेतच पश्चिम घाट आणि पूर्वघाट एकमेकांना भिडतात. पुन्हा दक्षिणेकडे पश्चिम घाट स्वतंत्रपणे पुढे जातो.
पालघाटने मध्य आणि दक्षिण सह्याद्रीची विभागणी झाली आहे. दक्षिण सह्याद्रीतील अनामलई, पलानी, कार्डमम (येलामाला) आणि अगस्त्यमलाई या महत्वाच्या पर्वतरांगा आहेत. सह्याद्री दक्षिणेकडे उंच होत जातो. अनामलाई पर्वतरांंगेतील अनैमुडी (2695 मी.) हे सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर. शेनकोट्टाने अगस्त्यमलाई पर्वतरांगेला इतर तीन रांगांपासून वेगळे केले आहे. अगस्त्यमलाई हे सह्याद्रीचे शेवटचे दक्षिण टोक.
उत्तरेकडून दक्षिणेकडे सह्याद्री पर्वतरांग उंंच होत जाते. उत्तर सह्याद्रीचा पूर्व भाग पसरट, तर दक्षिणेला तो निमुळता होत जातो. सह्याद्रीच्या उंंचीमुळे मान्सून वारे अडतात. म्हणून संपूर्ण पश्चिम, म्हणजेच, किनारपट्टीचा प्रदेश हा अतिपावसाचा आहे. तुलनेने पठारावर पावसाचे प्रमाण कमी होत जाते. शिवाय उंंच शिखरांमुळे वार्यांच्या गतीत होणार्या परिवर्तनाने सह्याद्रीच्या पूर्व भागात काही ठिकाणी पर्जन्यछायेचे प्रदेश निर्माण झाले आहेत. म्हणूनच दक्षिणी पश्चिम घाटाच्या आणि उत्तर पश्चिम घाटाच्या वनप्रकारात फरक होत जातो. दख्खन पठाराची नैसर्गिक विभागणीदेखील हवामान आणि पर्यायाने वनांच्या वेगळेपणाला कारणीभूत झाली आहे. या वेगळेपणाने प्रदेशागणिक असंख्य वनस्पती प्रकार अस्तित्वात आले. वनस्पती प्रकार आणि वनांच्या प्रकारानुसार प्राणीजीवनही वैविध्यपूर्ण झाले आहे. ही जैवविविधता पृथ्वीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. म्हणून जगातल्या 10 जैवविविधता संवदेनशील क्षेत्रात याचा समावेश होतो.
ही सह्याद्रीची वैशिष्ट्यपूर्ण भूपृष्ठनिर्मिती सहेतुक असेल की निर्हेतुक, हे सांंगणे अशक्य आहे. भूगर्भीय हालचाली आणि त्यानुसार होत गेलेल्या भूूपृष्ठीय पुनर्रचना, हवामान विविधतेला आणि पर्यायाने जैवविविधतेला पोषक ठरल्या. या हालचालींचा आणि पुनर्रचनांचा आपण आढावा घेतला. अगदी अचूक नसेल, पण ढोबळ कालखंड आपल्याला नक्की करता येतो. एवढ्या मोठ्या भूवैज्ञानिक इतिहासाकडे आपण चमत्कार म्हणून बघू शकतो. एखादे महाकाव्य म्हणून बघू शकतो. किंवा निव्वळ उपभोगवादी दृष्टिकोनातूनही बघू शकतो. लाखो वर्षे संथ गतीने चाललेल्या या प्रक्रियेला उपभोगवादी दृष्टिकोन
वजा करून प्रचंड गतिमान करू शकतो. अभावितपणे दिलेली ही मानवी गती आपल्याच नाशाला कारणीभूत ठरू शकते. तरीही, आपण सह्याद्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार नसू, तर नतद्रष्ट याशिवाय दुसरी संज्ञा आपल्यासाठी नाही.
रोहित जाधव, गडसेवक