सह्याद्री एक जीवन पद्धतीच म्हणायला पाहिजे. सह्याद्रीचा जन्म ज्वालामुखी आणि प्लेटस्च्या हालचालींमधून झाला, असे म्हटले जाते. 1600 किलोमीटरची ही पर्वतरांग पश्चिम घाट म्हणूनही ओळखली जाते. ती गुजरातपासून तामिळनाडूपर्यंत लांबच लांब पसरलेली आहे. जितकी हिची लांबी तितकीच हिची वैविध्यता.
या पर्वतांमध्ये अतिशय विलोभनीय असे जग आहे. उंच उंच शिखरे, घनदाट जंगले, नद्या, नाले, प्राणी, पक्षी, वनस्पती, किडे, जीवजंतू अशा अनेक जैववैविधतेने नटलेला हा सह्याद्री. हा सह्याद्री वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी खासियत आणतो. पाऊस, वारे, ऊन, सावल्यांचा हा सुंदर खेळ रचतो. मुख्यत्वे पाऊस आणण्याचे काम तो करतो आणि म्हणूनच तो हिरवाईने संपन्न असतो.
या सह्याद्रीचे आणि मानवाचे एक अनोखे नाते आहे. खरेतर तो आहे, म्हणून आपण आहोत. हा सह्याद्री जिवंत असल्याचे सातत्याने सांगत असतो. त्याची झाडे, पाने, फुले, पिके, जैविक वनस्पती, अनेक जीवजंतू, प्राणी, पक्षी हे सगळे तर तो जिवंत असल्याचे द्योतक आहे. याबरोबरच खळखळणारे झरे, वाहणार्या नद्या, कधी बरसणारा अन् जर कधी सह्याद्री रुसला तर अडून बसणारा पाऊस, यामुळे सह्याद्री आपली किमया दाखवतच असतो.
याच सह्याद्रीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे गडकिल्ले. काही शिवाजी महाराजांनी बांधलेले, काही काबीज केलेले.. सारेच रक्षण करते.या सह्याद्रीबाबतचे कुतूहलही खूप आहे. त्याच्या उंचच्या उंच कडा साद घालतात. गिर्यारोहकांना मोहून टाकतात. जे लोक या सह्याद्रीत फिरतात ते निश्चितच प्रभावित होतात.
एवढी सगळी संपन्नता असूनसुद्धा सह्याद्री अतिशय विनम्रपणे उभा आहे. कुठल्याही प्रकारचे रौद्रत्व त्याकडे नाही. आहे ती प्रेमळ हिरवाई आणि साद घालणारी जीवसृष्टी. या सह्याद्रीकडून शिकण्यासारखे खूप आहे. देणार्याने देत राहावे घेणार्याने घेत राहावे असेच आपले आणि त्याचे नाते. हजारो वर्षांपासून हा सह्याद्री आपल्याला देतच आलाय आणि त्याकडून आपण घेत आलो आहोत.
नैसर्गिक संपत्तीने अपार असलेला सह्याद्री लोकजीवनाचा वारसाही पुढे चालवतो. व्यापारी मार्ग, लेण्या, गुहा, छोटी-मोठी मंदिरे, त्याच्या आख्यायिका या सह्याद्रीच्या गोष्टी सगळेच कसे खूप रंजक आहे.नाशिकसारख्या परिसरात तर थोड्या उंचीवरून बघितले तर या सह्याद्रीची टोके आपल्याला खुणवत असतात. एक वेगळीच जीवनपद्धती उलगडतात. वेगवेगळ्या काळात होणारे अधिवास तिथे राहणारी लोकं त्यांची जीवनपद्धती, विचारधारा या सगळ्याबाबतच्या या सह्याद्रीकडे अनेक कथा आहेत.
त्र्यंबकेश्वरच्या कुशीत हा सह्याद्री अध्यात्मिक ताकद देतो. अनेक संत-महंत यांच्या विचारांनी हा समृद्ध होतो. सगळ्यांना अध्यात्मिक जगणे शिकवतो. अगदी परमेश्वरसुद्धा त्याच्या कुशीत वास करतो. अशा कथा पुराणात नमूद आहेत. हा परमेश्वर कोणाला निसर्गात दिसतो, कुणाला मंदिरात दिसतो, कुणाला अध्यात्मिक प्रक्रियेत अनुभवता येतो. खरेतर हा सह्याद्री प्रत्येकाला अभिव्यक्त होण्यासाठी प्रवृत्त करतो.
निसर्गाने तर तो इतका नटलेला आहे की, तो सतत आयुष्याच्या आनंदाकडे खुणवत राहतो. छोट्या छोट्या जीव, जंतू, किडे, मकोडे अशा असंख्य जीवांचा हा सांभाळ करतो. अगदी गवतांच्या प्रजातीपासून पाने-फुले, वेली, झाडे, मोठे वृक्ष या सगळ्यांचेसुद्धा संवर्धन करतो.किती आणि काय वर्णन करायचे या सह्याद्रीचे! आपल्यासारख्यांसाठी तर तो आयुष्याचा एक भागच आहे. या सह्याद्रीच्या भव्यतेकडे, व्यापकतेकडे, महत्त्वाकडे एक दृष्टिक्षेप टाकावा म्हणून देशदूतचा हा विशेष दिवाळी अंक – ‘सह्याद्री’
अनेक तज्ज्ञ लेखकांनी या सह्याद्रीचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केलाय. त्याला छायाचित्रांची छानशी जोड आहे. प्रत्येक लेखांमध्ये तुम्हाला सह्याद्रीचा एक वेगळा पैलू जाणवेल.अर्थात हा विषय खूपच मोठा आहे. त्यामुळे हा विषय हाताळताना आम्ही गोदावरीच्या खोर्यातला सह्याद्री डोळ्यांसमोर धरला आणि त्या आजूबाजूची सगळी जैवविविधता, जीवनपद्धती, लोकसंस्कृती, त्याच्या विविध गोष्टी, भूगोल, इतिहास, अध्यात्म हे सगळे उलगडायचा प्रयत्न केला आहे.
हा प्रयत्न तुम्हालाही आवडेल कारण या सह्याद्रीतून आपले आयुष्य खूप समृद्ध होत आहे. या समृद्ध करणार्या सह्याद्रीला आमचा मानाचा मुजरा.
सह्याद्री स्फूर्ती देणारा, ऊर्जा देणारा, अध्यात्मिक शांती देणारा आणि ज्ञानाचा खजिना असलेला. मात्र आता वेळ आली आहे ती या सह्याद्रीला जपण्याची. मानवी स्वभावाप्रमाणे आपण त्याचा गैरवापर करत आहोत. या विशेष दिवाळी अंकातून सह्याद्रीचे महत्त्व अधोरेखित करताना आम्हाला हेही सांगावसे वाटते की, या सह्याद्रीकडे जागरुकतेने बघण्याची गरज आहे. त्याला जपण्याची गरज आहे. त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. आतापर्यंत त्याने दिले आणि आपण घेतले. आता वेळ आली आहे आपल्यालाही परत काही देण्याची. ही जाणीव जरी निर्माण झाली आणि प्रत्येकाकडून हा सह्याद्री जपण्याचे छोटे-मोठे प्रयत्न सुरू झाले तर या विशेष दिवाळी अंकाचा उद्देश सफल होईल.
- डॉ. वैशाली बालाजीवाले
संपादक, दै. देशदूत, देशदूत टाईम्स