Saturday, June 22, 2024
Homeअग्रलेखफटाक्यांचा आवाज अती नको!

फटाक्यांचा आवाज अती नको!

आज धनत्रयोदशी! म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस! काल सर्वानी वसुबारस साजरी केली. वातावरणात उत्साह आहे. बाजार गर्दीने फुलला आहे. दिवाळी हा कदाचित एकमेव सण असावा; जो प्रत्येक जण त्यांच्या कुवतीप्रमाणे साजरा करतो. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाच्या वैशिष्ट्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. तरी दिवाळी म्हटले की, बालगोपाळांच्या आधी मनात फटाके फुटतात आणि नंतर रस्त्यांवर फुटतात. नाव बच्चे कंपनीचे आणि हौस मात्र मोठेही फेडून घेतात. लहान मुले लवंगी वाजवतात तर मोठे फटाक्यांचा आवाज करतात.

- Advertisement -

दिवाळीचे आणि फटाक्यांचे नाते लोकांना आवडते. फटाके दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात हेही खरे! तथापि गेल्या काही काळापासून फटाके फोडण्याच्या बाबतीत ‘अती तेथे माती’ असे होऊ लागले असावे का? गेल्या काही काळापासून हा आवाज वाढत आणि फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर अधिकच गडद होत आहे. न्यायसंस्थेने तर उद्विग्न होऊन मुंबई महापालिका क्षेत्रात फटाके वाजवण्याची वेळच ठरवून दिली. संध्याकाळी फक्त सात ते दहा याच वेळेत फटाके वाजवावेत, अशी तंबी दिली. अनेक सामाजिक संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते या मुद्यावर सक्रिय आहेत. वायू प्रदूषण माणसाचा श्वास किती गुदमरवू शकते, याचा घुसमटवणारा अनुभव दिल्लीकर वारंवार घेतात.

तिथली परिस्थिती हळूहळू नियंत्रणाबाहेर जाते की काय? अशी भीती सरकारसह नागरिकांचाही मनात दाटली आहे. वायू प्रदूषणामुळे पार्किसन्स, हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोक असे गंभीर आजार होऊ शकतात, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ नोंदवतात. जगभरात या मुद्यावर सतत सर्वेक्षणे होतात आणि संशोधनही सुरु आहे. राज्यातील अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. सतरा शहरांमध्ये हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या तीव्र आजारांचे सरकार सर्वेक्षण करणार आहे. त्यावर उपपयोजनेला प्राधान्य दिले जाईल, असे सरकारने जाहीर केले आहे. हे सगळे प्रयत्न हवा प्रदूषण कमी करण्यासाठी सुरु आहेत. त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यातच लोकांचे हित आहे. फटाके फोडणे हा मुद्दा अभिनिवेशाचा नाही तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा आहे. सण साजरा करताना कानांच्या आणि डोळ्यांच्या क्षमतांना इजा करून घेण्यात काय हाशील? डोळ्यांना इजा होणे गंभीर होऊ शकते आणि बहिरा झालेला कान बदलणे विज्ञानाला अजूनही शक्य झालेले नाही. एकदा कानाने ऐकण्याची क्षमता गमावली की गमावली. सध्या मोबाईलच्या वाढत्या व्यसनाचा माणसांच्या श्रवणशक्तीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यात फटाक्यांच्या अती दणदणाटाची भर घालायची का हे आता लोकांना देखील ठरवावे लागेल. दिवाळीला फटाके फोडू नयेत, अशी मागणी कोणीही केल्याचे लोकांच्याही कदाचित ऐकिवात असणार नाही. फक्त त्याची मर्यादा पाळावी एवढीच कदाचित सामाजिक संस्थांची आणि न्यायसंस्थेचीदेखील अपेक्षा असावी. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा!

- Advertisment -

ताज्या बातम्या