संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
शहराजवळील गुंजाळवाडी शिवारातील संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये ही जागा खाली करण्यासह विभक्त राहत असलेल्या पत्नीला साथ देत असल्याच्या रागातून डॉ. भानुदास डेरे यांनी मंगळवारी (दि.18) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास थेट चारचाकी वाहन रुग्णालयात घालून कर्मचार्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत रुग्णालयाचे नुकसान केले. याबाबत त्यांची कन्या डॉ. एकता वाबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पहाटेच शहर पोलिसांनी त्यांना अटक केली.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी डॉ. भानुदास डेरे आपली चारचाकी (क्र.एमएच.17, डीजे.1419) स्वतः चालवत आले आणि थेट रुग्णालयातील प्रतीक्षा कक्षात वाहन घुसवून स्वागत कक्षाचा कर्मचारी मयूर राजेंद्र अभंग (रा.दाढ बुद्रूक) याच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने प्रसंगावधान राखल्याने वाचला. यामध्ये प्रतीक्षा कक्षाच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. या घटनेत डॉ. डेरे यांच्या सोबत असलेला त्यांचा स्वीय सहाय्यक सोमनाथ पवार यानेही कर्मचार्यांना दमदाटी करत शिवीगाळ केली.
हे सर्व सुरू असताना त्यांच्या कन्या व रुग्णालयाच्या संचालिका डॉ. एकता वाबळे तेथे आल्या आणि त्यांनी वडिलांना निघून जाण्यास सांगितले. परंतु, त्यांनी शिवीगाळ करत जागा खाली करण्याची धमकी देत आरडाओरड सुरूच ठेवला. याप्रकरणी डॉ. एकता जगदीश वाबळे (रा. वरद बंगला, गंगासृष्टी, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी डॉ. भानुदास गेणुजी डेरे (रा. घोडेकर मळा, संगमनेर) व सोमनाथ पवार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या दोघांवर भारतीय न्यायसंहितेचे कलम 109, 351(3), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत हे करत आहे.




