अहिल्यानगर (प्रतिनिधी)
नोकरीच्या ठिकाणी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत, एका 33 वर्षीय डॉक्टर महिलेला चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
तरूणाने या कृत्याचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची आणि पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे, तर ‘गझवा-ए-हिंद’ करायचा आहे, असे म्हणत त्याने पीडितेवर लग्न करून धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
सावेडी परिसरात राहणार्या आणि एका रूग्णालयात काम करणार्या पीडित डॉक्टर महिलेने याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी इरफान शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बंगाल चौक जवळ, माळीवाडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडिताने दिलेेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिला आणि इरफान यांची 2022 मध्ये एका रूग्णालयात ओळख झाली होती. त्यानंतर इरफानने पीडितेला वेगवेगळ्या कारणांनी धमकावण्यास सुरूवात केली.
मार्च 2025 मध्ये त्याने माफी मागण्याच्या बहाण्याने पीडितेला एका खासगी ठिकाणी बोलावले. तेथे त्याने पीडितेला चॉकलेट दिले, जे खाल्ल्यानंतर पीडितेला चक्कर येऊ लागली. याच संधीचा फायदा घेत इरफानने तिच्यावर अत्याचार केला व त्याचे चित्रीकरण केले. यानंतर त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अनेकदा अत्याचार केले. तो सतत तिला लग्न करून धर्मांतर करण्यासाठी धमकावत होता. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पतीला सर्व हकीकत सांगितली आणि पोलिसांत धाव घेतली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलीस उपनिरीक्षक दळवी पुढील तपास करत आहेत.




